Jui Gadkari : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली म्हणजेच सर्वांच्या लाडक्या जुई गडकरीने ‘श्रीमंत पेशवा बाजीराव – मस्तानी’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. जुई पहिल्यापासून अभ्यासात प्रचंड हुशार होती. खरंतर, ‘बाजीराव – मस्तानी’ या मालिकेची ऑडिशन जुईच्या मैत्रिणीला द्यायची होती. पण, ऐनवेळी सिलेक्शन जुईचं झालं आणि इथून तिच्या सिनेविश्वातील प्रवासाला सुरुवात झाली.

जुईचं घर कर्जत येथे आहे आणि ‘बाजीराव – मस्तानी’चं शूटिंग सुद्धा कर्जतला व्हायचं त्यामुळे प्रवासाच्या दृष्टीने तिला खूप सोयीचं जायचं. यानंतर अभिनेत्रीला दुसऱ्या एका मालिकेची ऑफर आली. यावेळी मात्र जुईला फार लांबचा पल्ला गाठायचा होता. इंडस्ट्रीत नवीन असल्याने अभिनेत्रीला रोज कर्जत ते आरे कॉलनी असा प्रवास करावा लागायचा. याचा एक किस्सा जुईने ‘सकाळ’ वृत्तपत्रात स्वत: लिहिलेल्या लेखाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितला आहे.

जुई आरे कॉलनीत जाण्यासाठी पहाटे लवकर ट्रेन पकडायची. ही गोष्ट आहे २०१० मधली…७ जुलै २०१० रोजी बरोबर जुईच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी हा किस्सा घडला होता. पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे सर्वत्र वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. अभिनेत्रीच्या फोनची बॅटरी लो झाली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा कॉल टाइम कितीचा आहे हे जुईला माहिती नव्हतं. ती साडेअकरा वाजता झोपली आणि त्यानंतर पहाटे अडीच-तीनच्या सुमारास लाइट आली. त्यावेळी फोन चार्जिंगला लावला आणि पाहते तर सकाळी साडेसहाचा कॉलटाइम होता.

साडेसहाला आरे कॉलनीत पोहोचण्यासाठी जुईला पहाटे चार वाजताच्या लोकलने निघावं लागलं. अभिनेत्री वेळेत पोहोचली…तयार झाली, स्क्रिप्ट पाठ केली आणि आता सीनसाठी कधी बोलावतील याची वाट पाहत जुई बसली होती. आठ वाजले, दहा वाजले, दुपारचा ब्रेक झाला, संध्याकाळचे सात वाजले तरीही सीन लागला नाही. शेवटी जुईने सर्वप्रथम असिस्टंटकडे चौकशी केली…तो बोलला माहिती नाही. यानंतर दिग्दर्शकांना विचारलं, यावर ते म्हणाले होते, “लागेल तुझा सीन नक्की लागेल” एकीकडे सीन झालेला नव्हता आणि दुसरीकडे जुईला शेवटची लोकल चुकणार…याचं दडपण होतं.

शेवटी रात्रीचे अकरा वाजले आणि तरीही जुईला शूटसाठी बोलावलं नव्हतं. तिने ईपीला जाऊन विचारलं, “सर माझा सीन होणार आहे का?” यानंतर त्या ईपींनी काहीही ऐकून न घेता जुईला अतिशय कठोर शब्दांत सुनावलं होतं, “व्हॉट द हेल तू काय विचार करतेस? नितीन देसाईंकडे काम करतेस म्हणून स्वत:ला मोठी अभिनेत्री समजू लागली आहेस का?” यानंतर जुईने कसंबसं कर्जतला जाणारी आता शेवटची लोकल आहे असं सांगितलं पण, यावर ते ईपी अभिनेत्रीला म्हणाले, “तुझ्यासारख्या मुलीने जॉब करायला हवा, अक्कल आहे का कोणत्या फिल्डमध्ये आहेस?”

यानंतर मालिकेच्या लेखकाला बोलावून जुईची भूमिका काढून टाका असं सांगितलं गेलं आणि यापुढे ही मुलगी माझ्या सेटवर दिसता कामा नये असंही ते म्हणाले. जुई यानंतर घराच्या दिशेने निघाली. कर्जतची ट्रेन गेलेली होती…शेवटी कल्याणपर्यंत जुई एक्स्प्रेसने गेली. सकाळ होईपर्यंत पहिल्या ट्रेनची वाट पाहिली. स्टेशनवर खूप रडली आणि तिचा वाढदिवस देखील सुरू झाला होता. यानंतर काही दिवसांनी अभिनेत्रीला ‘पुढचं पाऊल’ मालिकेची ऑफर आली. ज्या ठिकाणी अपमान झाला त्याठिकाणी जुईच्या नव्या मालिकेच्या निमित्ताने एकटीसाठी व्हॅनिटी व्हॅन लागली होती. त्यावेळी डोळे भरून आले होते अशा भावना जुईने व्यक्त केल्या आहेत.