Tharala Tar Mag Fame Jui Gadkari : अलीकडच्या काळात अनेक कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अनेकदा नेटकऱ्यांकडून वैयक्तिक पातळीवर टीका केली जाते किंवा कलाकारांच्या खाजगी आयुष्यावर कमेंट्स करून भाष्य केलं जातं. अशावेळी मात्र कलाकार संबंधित युजरला खडेबोल सुनावतात. ‘ठरलं तर मग’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या जुई गडकरीला सुद्धा असाच काहीसा अनुभव आला.

जुई आपल्या संयमी आणि शांत स्वभावासाठी ओळखली जाते. ती कधीच कोणत्याच गोष्टीवर पटकन राग व्यक्त करत नाही. मात्र, काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर जुई सहन न करता आपली स्पष्ट बाजू मांडते.

अभिनेत्रीने नुकतंच नवरात्रीनिमित्त फोटोशूट केलं होतं. याचे फोटो जुईने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. हे फोटो पाहून एका नेटकऱ्याने अभिनेत्रीला पर्सनलस मेसेज केलेत. याचा स्क्रीनशॉट शेअर करत जुईने संताप व्यक्त केला आहे. या अशा मानसिकतेच्या लोकांनी लवकर बरं व्हावं असंही तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

“जुई लग्न कर…कोण असूदेत पण कर; TRP कमी होतोय मॅडम, तुमचं मार्केटिंग आधीच कमी पडलंय. मेकअप आणि दिसणं वेगळं असतं. मालिकेत तुम्ही मोठ्या असाल पण लग्न नाही, कुटुंब नाही….विचार करा” असे मेसेज या नेटकऱ्याने जुईला केले आहेत.

या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत अभिनेत्रीने या नेटकऱ्याला चांगलंच सुनावलं आहे. “अशा माणसांची कीव येते…लवकर बरे व्हा…देव तुम्हाला सुबुद्धी देवो. देवाच्या कृपेने तुमचा त्रास लवकरात लवकर कमी होवो…#SickPeople #SickMinds” असं जुईने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

jui
जुई गडकरीने शेअर केला स्क्रीनशॉट ( Jui Gadkari )

दरम्यान, जुईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर गेल्या अडीच वर्षांपासून अभिनेत्री ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायली ही प्रमुख भूमिका साकारत आहे. तिची ही मालिका सुरू झाल्यापासून टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर आहे. आता लवकरच जुई लेखिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जुईने यापूर्वी ‘पुढचं पाऊल’, ‘श्रीमंत पेशवा बाजीराव-मस्तानी’, ‘वर्तुळ’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे.