Tharala Tar Mag Fame Priya New Home : ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रिया ही खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्रियांका तेंडोलकरने काही दिवसांपूर्वीच मुंबईत आलिशान २ बीएचके घर घेतलं. सध्या अभिनेत्रीच्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याशिवाय प्रियांकाच्या या सुंदर घराचं चाहते भरभरून कौतुक करत आहे.

प्रियांकाने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या संपूर्ण घराची झलक दाखवली. अभिनेत्रीच्या नव्या घराचा हॉल खूपच प्रशस्त आहे. याशिवाय उत्तम रंगसंगती, किचन, बेडरुममधील पेटिंग्जनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रियांकाने तिचं नवीन घर स्वत: अन् तिच्या आई-बाबांच्या साथीने सजवलं आहे. घरात इंटिरियर करणं सामान्य लोकांना परवडत नाही हे सगळे गैरसमज आहेत. तुम्ही फार स्मार्टली या सगळ्या गोष्टी करू शकतात; ज्यामुळे कमी पैशांत छान घर सजावता येतं, असं प्रियांकाने यावेळी सांगितलं.

प्रियांकाला याबद्दल इतकी माहिती असण्याचं कारण म्हणजे, अभिनेत्रीचा इंटिरियरचा फॅमिली बिझनेस आहे. फॅमिली बिझनेसबद्दल अभिनेत्री सांगते, “आमचा इंटिरियरचा बिझनेस आहे. आम्ही इंटिरियर डिझायनर्स म्हणून काम करतो. जवळपास २० वर्षांपासून आम्ही हा बिझनेस करतोय. त्यामुळे यापूर्वी खूप लोकांची 2BHK, 3BHK घरं आम्ही सजवली आहेत. त्यावेळी असं वाटायचं… अरे! आपलं जेव्हा घर होईल ना…तेव्हा असं करू, तसं करूयात. हळुहळू आई-बाबा आणि मी आम्ही तिघांनी मिळून हे घर घेण्याचा निर्णय घेतला. अर्थात, २ बीएचके घर घेणं हा निर्णय सुरुवातीला आमच्यासाठी खूप कठीण होता. पण, नंतर असं वाटलं की, ठिके घेऊयात.”

प्रियांका तेंडोलकर पुढे म्हणाली, “घर घेतल्यावर आम्हा तिघांनाही सुंदर इंटिरियर करायचं होतं. प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना होत्या. पण, या सगळ्यात आपल्याला जे परवडेल असं आपण काय करू शकतो याकडेही आम्ही विशेष लक्ष दिलं. मला विचाराल तर, खूप लोकांचा असा गैरसमज असतो की, इंटिरियर करणं फार खर्चिक आहे. पण, प्रत्यक्षात असं काही नसतं. तुम्ही थोडा हुशारीने विचार केलात तर घराचं इंटिरियर करताना तुम्ही खपू कमाल डिझाइन्स साकारू शकाल.”

priya
‘ठरलं तर मग’ फेम प्रियाचं नवीन घर

“माझी आई वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवते. आता आईमुळे आमचाही या सगळ्यावर फार विश्वास आहे. त्यानुसार आम्ही संपूर्ण घर डिझाईन केलं.” असं प्रियांकाने यावेळी सांगितलं.