Actress Jyoti Chandekar Passed Away : मराठी मालिका, नाटक, सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अडीच वर्षांपासून त्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या.
गेल्या आठवड्यापासून त्या आजारी होत्या. ३-४ दिवसांपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही ज्योती चांदेकर यांची मुलगी आहे. आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत अभिनेत्री तेजस्विनी पंडितने या क्षेत्राची वाट धरली.
आज ज्योती चांदेकर यांच्या निधनाच्या बातमीने मराठी सिनेसृष्टीला खूप मोठा धक्का बसला आहे. याशिवाय ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कलाकारांवर सुद्धा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पुणे येथील रविवारी वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, गेल्यावर्षी ‘ठरलं तर मग’ मालिकेत मंगळागौरीचं शूट करताना देखील ज्योती चांदेकर आजारी पडल्या होत्या. त्यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर जवळपास दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर त्या पुन्हा एकदा मालिकेत परतल्या होत्या.
ज्योती चांदेकर यांच्याबद्दल….
ज्योती चांदेकर यांनी ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. याशिवाय छोट्या पडद्यावरील ‘तू सौभाग्यवती हो’, ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र, ‘ठरलं तर मग’ मालिकेतील त्यांनी साकारलेली पूर्णा आजीची भूमिका सर्वत्र प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यांच्या निधनानंतर मालिकेच्या चाहत्यांवर सुद्धा शोककळा पसरली आहे.