Tharala Tar Mag Fame Sayali : ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने मालिकेतील सगळ्याच कलाकारांना खूप मोठा धक्का बसला आहे. ज्योती चांदेकर ६९ वर्षांच्या होत्या. काही दिवस आराम करण्यासाठी त्या पुण्याला आपल्या घरी गेल्या होत्या. यावेळी त्यांची प्रकृती बिघडली आणि यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना ज्योती चांदेकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेली अडीच वर्षे त्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या. त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यामुळे आता त्यांच्या निधनानंतर ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्ण आजी कोण साकारणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अनेकांनी आजीची भूमिका रिप्लेस करू नका असा सल्ला वाहिनी आणि मालिकेच्या टीमला दिला आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेतील मुख्य अभिनेत्री जुई गडकरीला ( सायली ) देखील असंख्य चाहते पूर्णा आजीच्या रिप्लेसमेंटबद्दल प्रश्न विचारत आहेत. यावर सायलीने नुकत्याच घेतलेल्या ‘आस्क मी सेशन’मध्ये प्रतिक्रिया दिली आहे. पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी कोणाची एन्ट्री होणार आणि कधी होणार? असा प्रश्न चाहत्यांनी अभिनेत्रीला विचारला होता. यावर जुई म्हणाली, “मला याबद्दल अनेक लोक प्रश्न विचारत आहेत. आम्ही सगळेच तिला मिस करत आहोत. पण, आता तिच्या भूमिकेसाठी नवीन कोण येणार वगैरे…हे सगळं आम्हाला सुद्धा माहिती नाहीये. या सगळ्या गोष्टींबाबत चॅनेल निर्णय घेणार आहे. हे निर्णय चॅनेलचे असतात. त्यामुळे चॅनेलने याबाबत अधिकृत माहिती दिल्याशिवाय कोणीही युट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये.”

यापूर्वी ‘ठरलं तर मग’ मालिकेचे दिग्दर्शक आणि अमित भानुशाली यांनी देखील चॅनेल आणि निर्माते यावर अंतिम निर्णय घेतील असं म्हटलं होतं. दरम्यान, ‘ठरलं तर मग’च्या सेटवरचा प्रत्येकजण सध्या पूर्णा आजीला मिस करत आहे. त्यामुळेच मालिकेचे ९०० भाग पूर्ण झाल्यावर या टीमने सेटवर आजीच्या नावाने सदाफुलीचं रोपटं लावल्याचं पाहायला मिळालं होतं.