‘ठरलं तर मग’ मालिकेत आता नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अर्जुनचा वाढदिवस आणि किल्लेदार कुटुंबीयांचा काही वर्षांपूर्वी झालेला अपघात या सध्याच्या सीक्वेन्सने प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे. अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त सुभेदारांच्या घरात विशेष तयारी करण्यात आलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असूनही सायलीने स्वत: पुढाकार घेत नवऱ्याच्या वाढदिवसाची सगळी तयारी करते, त्याच्यासाठी केक बनवते. या सगळ्या गोष्टी पाहून अर्जुनला प्रचंड आनंद होतो. परंतु, आता लवकरच मालिकेचा विशेष भाग प्रदर्शित होणार आहे. याचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला मिळणार जाणून घेऊयात…

सायलीला हळुहळू तिचा भूतकाळ आठवत असल्याने ती प्रचंड तणावात असते. अशातच वाढदिवसाला कल्पना तिला अर्जुनला केक भरवायला सांगते. पण, केक भरवताना सायली चुकून अर्जुनच्या गालावर केक लावते. हे दृश्य पाहून वाढदिवसाला आलेल्या रविराज किल्लेदारांना तन्वीची आठवण येते. सायलीला पाहून त्यांना सारखा तन्वीचा भास होऊ लागतो. या सगळ्या गोष्टींमुळे ते विचलित होतात.

हेही वाचा : काजोलने पाहिला माधुरी दीक्षितच्या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर, प्रतिक्रिया देत म्हणाली…

सुभेदारांकडे वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू असताना दुसरीकडे प्रतिमा स्वत:ची ओळख ‘कविता’ अशी सांगून कुसूमकडे राहत असते. अचानक रात्री तिचंही सायलीप्रमाणे डोकं दुखू लागतं. यानंतर प्रतिमा कोणताही विचार न करता मंदिरात जाते असं सांगून कुसूमच्या घरातून निघत असते. पण, कुसूम तिच्याकडे चौकशी करून तिला थांबण्याची विनंती करते. एकीकडे प्रतिमा स्वत:ची ओळख बदलून वावरत असते, तर दुसरीकडे रविराज किल्लेदार तिची आतुरतेने वाट पाहत असतात. ती जिवंत असेल याची त्यांना पूर्ण खात्री असते. अर्जुनच्या वाढदिवशी त्यांच्या मनात सायलीबद्दल एक वेगळी आपुलकी निर्माण होते आणि किल्लेदार तिला सुखी राहण्यासाठी आशीर्वाद देतात.

हेही वाचा : पूजा सावंतला भावले होणाऱ्या नवऱ्याचे ‘हे’ गुण! खुलासा करत म्हणाली, “त्याला चांगलं माहितीये…”

आता आगामी भागात प्रेक्षकांना सायलीला भूतकाळातील सर्व गोष्टींचा भास होत असल्याचं पाहायला मिळणार आहे. अर्जुनसह कारने प्रवास करत असताना अचानक सायलीला सगळ्या गोष्टी आठवू लागतात. अपघाताचं पुसट चित्र तिच्या डोळ्यासमोरून जातं. या सगळ्या घटनेने ती पूर्णपणे अस्वस्थ होते. सुभेदारांच्या घरी पोहोचल्यावर तिला बालपणीच्या सगळ्या गोष्टी अप्रत्यक्षपणे आठवू लागतात. सायलीची अवस्था पाहून अर्जुनला नेमकं काय घडतंय हे समजत नाही. तो अपघाताबद्दल तिच्याकडे चौकशी करतो तेवढ्यात सायली चक्कर येऊन पडते. असं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. मालिकेचा हा विशेष भाग २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : “माझ्या नवऱ्याने…” ‘लस्ट स्टोरीज २’मधील इंटिमेट सीनबद्दल अमृता सुभाषचा खुलासा; म्हणाली, “आम्ही दोघंही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता येत्या काळात सायलीला भूतकाळामुळे होणारा त्रास अर्जुन कशा पद्धतीने समजून घेणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायलीची अवस्था पाहून अर्जुनसमोर किल्लेदारांच्या अपघाताचं रहस्य उघड होणार का? हे आगामी भागांमध्ये पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.