Tharala Tar Mag Fame Sayali : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. गेल्या अडीच वर्षांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील सायली-अर्जुनची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. याशिवाय या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचं ऑफस्क्रीन एकमेकांशी खूप छान बॉण्डिंग आहे. याबद्दल मालिकेची नायिका सायली म्हणजे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री जुई गडकरीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
जुईने नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यावेळी जुईने चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. यावेळी अभिनेत्रीच्या एका चाहत्याने तिला, “ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर तुला कोण जास्त आवडतं, अशी एक मैत्रीण जिच्याशी तू मनातल्या सगळ्या गोष्टी मोकळेपणाने शेअर करतेस? त्या व्यक्तीचं नाव काय” असा प्रश्न विचारला.
मालिकेत जरी सायलीच्या सगळ्यात जवळचा अर्जुन असला तरी ऑफस्क्रीन सायली म्हणजेच जुईची सगळ्यात जवळची मैत्रीण तिची सासूबाई कल्पना आहे. प्राजक्ता दिघे यांच्याशी तिचं खूप छान बॉण्डिंग आहे.
प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत जुई लिहिते, “मी माझ्या मनात फार काही ठेवतच नाही. पण प्राजू मला सेटवर आईची कमी भासू देत नाही. माझे खूप लाड करते आणि हो वेळ पडल्यास ओरडते सुद्धा…मी तिच्याशी खूप गप्पा मारते. आम्ही दोघी रुम पार्टनर्स सुद्धा आहोत.”
दुसऱ्या एका नेटकऱ्याने जुईला, “आतापर्यंतची तू काम केलेली तुझी सर्वात आवडती मालिका कोणती आहे?” असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्री म्हणाली, “मी माझ्या सगळ्याच भूमिकांवर खूप प्रेम केलंय आणि सगळ्या मालिकांमध्ये मनापासून काम केलं. पण, ज्या भूमिकेने माझ्यावर प्रेम केलं ती आहे सायली! सायलीने मला सगळं काही दिलं ज्याची मी वाट पाहत होते.”

दरम्यान, जुईची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रोज रात्री ८:३० वाजता प्रसारित केली जाते.