Tharala Tar Mag New Actors Entry : ‘ठरलं तर मग’ मालिकेत काही दिवसांपूर्वी दोन नव्या कलाकारांची एन्ट्री झाली. ‘हे’ दोन कलाकार नेमके कोण आहेत आणि त्यांच्या एन्ट्रीमुळे मालिकेत कोणतं नवीन वळण येणार आहे हे सविस्तर जाणून घेऊयात…
‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अर्जुन सायलीच्या आई-वडिलांचा शोध घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मधुभाऊंमुळे सायलीचे आई-बाबा जिवंत आहेत हे त्याला समजतं. मात्र, सायली दुसऱ्या कोणाची नव्हे तर किल्लेदारांची मुलगी असल्याचं सत्य अद्याप कोणालाही समजलेलं नाहीये. मधुभाऊ कोमात जातात त्यामुळे आता काही करून सायलीच्या आई-बाबांना शोधायचं असं अर्जुन ठरवतो.
किल्लेदारांच्या घरात खोटी तन्वी म्हणून एन्ट्री घेण्याआधी प्रियाने सायलीचं बालपणीचं गाठोडं लपवून ठेवलेलं असतं. ती दोघींच्या गाठोड्याची आपआपसांत अदलाबदल करते आणि यामुळे मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. अर्जुन सायलीच्या भूतकाळाबाबत माहिती मिळवताना प्रियाच्या खऱ्या आई-बाबांना शोधून काढतो. प्रियाच्या आई-बाबांचं नाव असतं सदाशिव व श्रद्धा लोखंडे.
सदाशिव व श्रद्धा लोखंडे हेच सायलीचे आई-बाबा आहेत असा गैरसमज अर्जुनचा होतो आणि तो दोघांनाही सुभेदारांच्या घरी घेऊन येतो. इतक्या वर्षांनी आई-बाबांना घरी आलेलं पाहून सायलीला सुखद धक्का बसतो. पण, प्रियाला हे सायलीचे नसून आपले खरे आई-बाबा आहेत हे सत्य माहिती असतं.
ठरलं तर मगमध्ये एन्ट्री घेतलेल्या कलाकारांविषयी…
मालिकेत सदाशिव लोखंडे ही भूमिका अभिनेते राजन जोशी साकारत आहेत. आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. ‘कलर्स मराठी’च्या ‘रमा राघव’ या मालिकेत त्यांनी राघवच्या वडिलांची भूमिका साकरली होती. तर, श्रद्धा लोखंडे ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री किर्ती पेंढारकरला घराघरांत ओळखलं जातं. यापूर्वी किर्तीने ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत काम केलेलं आहे. याशिवाय ‘एप्रिल मे ९९’, ‘मु.पो. बोंबिलवाडी’ या सिनेमांमध्येही ती झळकली आहे.
दरम्यान, आता सदाशिव व श्रद्धा लोखंडे सुभेदारांच्या घरी आल्यावर मालिकेत काय ट्विस्ट येणार? हे दोघंही आपल्या खऱ्या मुलीला ओळखणार का? प्रियाचं सत्य केव्हा उघड होणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर आहेत.