‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुनचा वाढदिवस आणि सायलीला येणारी भूतकाळाची आठवण हा सीक्वेन्स सुरू आहे. अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त सुभेदारांच्या घरात उत्साहाचं वातावरण असल्याचं गेल्या काही भागांमध्ये पाहायला मिळालं. नवऱ्याचा वाढदिवस साजरा करून सायली आश्रमात जाते. यानंतर पुढे काय घडणार? याचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अर्जुनच्या वाढदिवशी काही वर्षांपूर्वी किल्लेदार कुटुंबीयांचा अपघात होतो आणि बालपणी सायली (तन्वी) मधुभाऊंना सापडते. घरातील कार्यक्रम पार पडल्यावर सायली-अर्जुन एकत्र आश्रमातील मुलांना भेटायला जातात. त्याठिकाणी नेहमीप्रमाणे कुसूम आणि अर्जुनमध्ये मजेशीर खटके उडतात.
आश्रमातील मुलांबरोबर वेळ घालवल्यानंतर सायली पुन्हा माघारी परतते. यावेळी वाटेतून प्रवास करत असताना सायलीच्या डोक्यात भूतकाळाच्या आठवणी सुरू होतात. यामुळे ती प्रचंड अस्वस्थ होते. तिला घाम फुटतो, चक्कर येते यावेळी अर्जुन नेमकं काय होतंय याची चौकशी तिच्याकडे करतो. पण, सायलीला काहीच सांगता येत नाही.
हेही वाचा : आली समीप लग्नघटिका! मुग्धाला लागली प्रथमेशच्या नावाची हळद, लग्नघरातील फोटो आले समोर
घरी पोहोचल्यावर घाईघाईत गाडीतून उतरून सायली सुभेदारांच्या घराच्या दिशेने धावत जाते. सुभेदारांच्या घरी पोहोचल्यावर तिला बालपणीच्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात. सायलीची अवस्था पाहून अर्जुनला नेमकं काय घडतंय हे समजत नाही. तो अपघाताबद्दल तिच्याकडे चौकशी करतो तेवढ्यात सायली चक्कर येऊन पडते.
सायलीला शुद्ध आल्यावर सासूबाई कल्पनासह सगळेजण तिला भेटायला येतात. यावेळी सायली तिला अपघात आणि वाढदिवसाचं रहस्य सांगते. यावर कल्पना ‘तुझा वाढदिवस असल्याचं तू आम्हाला का नाही सांगितलंस?’ असं सायलीला विचारते. एवढ्यात मोनिका “आपल्याला हिचा वाढदिवस माहित नसणं स्वाभाविक आहे पण, अर्जुनचं काय?” असा प्रश्न उपस्थित करते. असं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता येत्या भागात सायली खरी तन्वी असल्याचं सत्य अर्जुनला समजेल का? सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं काय होणार या गोष्टी पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.