‘ठरलं तर मग’ मालिका सध्या रंजक वळणावर चालू आहे. मालिकेत प्रियाकडून पुरावे कसे मिळवता येतील याचा शोध अर्जुन-सायली घेत असल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. परंतु, चैतन्य वेळीच आल्याने त्या दोघांचा डाव फसतो आणि अखेर प्रिया-साक्षी सतर्क होतात. साक्षी पुन्हा एकदा नाटक करून चैतन्यला आपल्या जाळ्यात ओढते. या सगळ्याचा परिणाम वात्सल्य आश्रम केसवर होणार याचा पुरेपूर अंदाज अर्जुनला असतो.

प्रियाला खोटं बोलून अडकवण्याच्या प्लॅनमध्ये अर्जुन-सायली अयशस्वी ठरतात. यानंतर दोघेही माघारी येतात. यावेळी प्रताप अर्जुनची भेट घेण्यासाठी त्याच्या खोलीत जातो. एवढ्यात अर्जुनला सायली आल्याचा भास होतो आणि तो लगेच “मिसेस सायली…” असा आवाज देतो. अर्थात लेकाच्या तोंडून मिसेस सायली ऐकल्यावर प्रताप काहीसा विचारात पडतो. परंतु, शेवटी सारवासारव करून अर्जुन वडिलांशी छान गप्पा मारतो. दूर उभी असलेली सायली यांचं नातं असंच टिकून राहूदेत अशी प्रार्थना देवाकडे करते.

हेही वाचा : प्रवीण तरडेंसह ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, फोटो शेअर करत म्हणाले…

आता लवकरच मालिकेत गुढीपाडवा विशेष भागाचा सीक्वेन्स सुरू होणार आहे. सुभेदारांच्या घरी सणाच्या दिवशी एका खास पाहुणीची एन्ट्री होणार आहे. गुढीची पूजा करताना अर्जुन कुटुंबीयांना काही वेळ वाट बघा कोणीतरी येतंय अशी कल्पना देतो…अशातच गाडीतून उतरून एक नवीन पाहुणी सुभेदारांच्या घराच्या दिशेने चालत येते. ही पाहुणी दुसरी तिसरी कोणीही नसून ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री रुचिरा जाधव आहे.

हेही वाचा : झी नाट्य गौरव २०२४ : प्रिया-उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाने मारली बाजी, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत लवकरच रुचिरा जाधव एन्ट्री घेणार आहे. यात ती कोणती भूमिका साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही. परंतु, ही अर्जुनची फार चांगली मैत्रीण आहे असा प्राथमिक अंदाज नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनुसार बांधला जात आहे. अर्जुनने या नव्या पाहुणीला मिठी मारल्याचं पाहून सायलीच्या चेहऱ्यावर काहीसा नाराजीचा सूर उमटतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता रुचिराच्या एन्ट्रीनंतर अर्जुन-सायलीच्या नात्यावर काय परिणाम होणार? दोघांचं नातं बहरेल की त्यांच्यात कायमचा दुरावा येईल हे प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.