Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिका ५ डिसेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. गेली अडीच वर्षे ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट रोजी निधनं झालं. यामुळे संपूर्ण टीमवर दु:खाचा डोंगर कोसळला. पूर्णा आजीला आम्ही कधीच विसरू शकणार नाही अशा भावनिक पोस्ट या मालिकेच्या कलाकारांनी शेअर केल्या होत्या. सेटवर सगळ्यांशी ज्योती चांदेकर यांचं खूपच सुंदर बॉण्डिंग होतं.

आजही सेटवरचा प्रत्येकजण पूर्णा आजीची आठवण काढतोय. नुकतेच ‘ठरलं तर मग’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण झाले आहेत. यावेळी सेटवर दिवंगत अभिनेत्री ज्योती चांदेकर म्हणजेच सर्वांच्या लाडक्या पूर्णा आजीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मालिकेच्या टीमने तिच्या नावे वृक्षारोपण करत सदाफुलीचं रोपटं लावलं. याबाबत जुईने पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जुई गडकरीची पोस्ट

जुई गडकरी म्हणते, “आज ‘ठरलं तर मग’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण झाले… आज सेटवर केक कापून, आजीच्या नावाची ‘सदाफुली’ लावली आणि हा दिवस साजरा केला… ती हे बघायला हवी होती… पण तिचे आशीर्वाद नक्की आहेत. तिच्या अशा अचानक जाण्याने बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या. सीन फिरवावे लागले. अजूनही आम्ही आणि कथानक यातून सावरतोय… पण, तुम्ही जी साथ देत आहात त्याला सलाम…तुम्हाला जे बघायचंय ते लवकरच दिसेल… तोपर्यंत तुमचं प्रेम.. तुमचा “ठरलं तर मग” मालिकेवरचा विश्वास… तुमची साथ अशीच राहूद्या…॥जय गुरुदेव दत्त॥”

जुईच्या पोस्टवर असंख्य नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. “आम्ही पूर्णा आजीला खूप जास्त मिस करतोय…त्यांची आठवण कायम येत राहील भावपूर्ण श्रद्धांजली” अशा भावनिक प्रतिक्रिया प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये दिल्या आहेत.

दरम्यान, पूर्णा आजीच्या रिप्लेसमेंटवर अद्याप कोणताही विचार करण्यात आलेला नाही, आम्ही कोणीही या धक्क्यातून सावरलेलो नाही आहोत असं अर्जुनची भूमिका साकारणाऱ्या अमित भानुशालीने मालिकेचे ९०० भाग पूर्ण होताच स्पष्ट केलं आहे.