Marathi Serial TRP Chart : छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीवरून ठरवली जाते. गेल्या काही महिन्यांत विविध वाहिन्यांवर अनेक नवनवीन मालिका सुरू झाल्या आहेत. आदिनाथ कोठारे, सोनाली खरे यांसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांनी छोट्या पडद्यावर कमबॅक सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे अर्थातच मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकवर्गात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय.
आदिनाथ कोठारेची मुख्य भूमिका असलेल्या ‘नशीबवान’ मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या आठवड्याच्या टीआरपी रेटिंगनुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीआरपीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. टीआरपीच्या यादीमधील अव्वलस्थान ‘ठरलं तर मग’ने कायम राखलं आहे. तर, ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या दोन्ही मालिका टीआरपी चार्टमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत.
टीआरपीच्या यादीत या आठवड्यात एका मालिकेने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं आहे आणि ती म्हणजे ‘अबोली’. या मालिकेचं प्रसारण ‘स्टार प्रवाह’वर सध्या रात्री ११:३० वाजता केलं जातं. इतक्या उशिरा प्रसारित होऊनही या मालिकेने २.१ टीआरपी रेटिंग मिळवलं आहे.
याशिवाय रात्री साडेदहा वाजता प्रसारित होणाऱ्या ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेने सुद्धा ३.८ रेटिंगसह टीआरपीच्या यादीत टॉप-५ मध्ये एन्ट्री घेतली आहे. यावरून या दोन्ही मालिकांची लोकप्रियता किती मोठ्या प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. ‘अबोली’, ‘तू ही रे माझा मितवा’ यांना प्राइम टाइम नसूनही या मालिका टीआरपीच्या यादीत बाजी मारत आहेत.
मालिकांचा टीआरपी
१. ठरलं तर मग – ५.४
२. घरोघरी मातीच्या चुली – ४.५
कोण होतीस तू काय झालीस तू – ४.५
३. नशीबवान – ४.१
४. लक्ष्मीच्या पाऊलांनी – ४.०
५. तू ही रे माझा मितवा – ३.८
६. येड लागलं प्रेमाचं – ३.५
लग्नानंतर होईलच प्रेम – ३.५
७. अबोली – २.१ ( रात्री ११:३० )
दरम्यान, ‘स्टार प्रवाह’वर या महिन्यात ‘काजळमाया’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे ही मालिका सुरू झाल्यावर ‘अबोली’ प्रेक्षकांचा निरोप घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टीआरपीची आकडेवारी पाहून अनेकांनी ‘अबोली’ मालिका संपवू नका अशाही कमेंट्स पोस्टवर केल्या आहेत.