Tharla Tar Mag Fame Praajakta Dighe Lovestory : प्राजक्ता दिघे या मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. प्राजक्ता यांनी आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत कल्पना ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. अशातच त्यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे.

प्राजक्ता दिघे यांनी खऱ्या आयुष्यात राजन दिघे यांच्याबरोबर लग्न केलं असून त्यांचे पती इंटिरिअर डिझायनिंग या क्षेत्रात काम करतात, तर या दोघांना जय नावाचा मुलगाही आहे. नुकतंच दिवाळीनिमित्त ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे. यामध्ये प्रेमकहाणीबद्दल सांगताना प्राजक्ता म्हणाल्या, “त्याची चुलत बहीण माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे. तर हा सुट्टीत तिच्याकडे राहायला यायचा. मी आणि ती दादरला राहायचो हा अंधेरीला राहायचा, माझी मैत्रीण कायम याचं कौतुक करायची.”

पहिल्या भेटीतच झालं प्रेम

प्राजक्ता पुढे म्हणाल्या, “ती सतत याचं कौतुक करायची, तो तिच्यासाठी गुरू होता त्यामुळे राजन दादा हे नाव कायम तिच्या तोंडी असायचं आणि मिही त्याला दादा म्हणायचे. तो जे काम करायचा त्याचे फोटो ती मला दाखवायची आणि त्याबद्दल मी माझ्या बाबांनाही सांगायचे, ते खूप हौशी होते. आम्ही त्यावेळेला चाळीत राहायचे, पण माझ्या वडिलांना त्यातही घर सजवायला खूप आवडायचं. ते म्हणाले, बोलाव त्याला, बघू काहीतरी करायला सांगू; असं करत तो घरी आला. त्याने पूर्ण घराचं कामच काढलं आणि जेव्हा तो पहिल्यांदा माझ्या घरी आला तेव्हा मला लव्ह ॲट फर्स्ट साइट झालं.”

प्राजक्ता पुढे म्हणाल्या, “माझी पहिली मालिका आली ‘रथचक्र’, तेव्हा त्यात माझा सोज्वळ लूक होता. तेव्हा त्याने मला पाहिलं होतं आणि तो सहज बायको पाहिजे तर अशी असं म्हणालेला.” पुढे प्राजक्ता यांचे पती राजन म्हणाले, “पण घरात हिला पाहिलं तेव्हा ही तीच आहे हे कळलं नव्हतं.” प्राजक्ता यापुढे म्हणाल्या, “जेव्हा त्याने काम सुरू केलं, तेव्हा मी कॉलेजमध्ये होते आणि मी फक्त सुरुवातीचे दोन लेक्चर बसायचे आणि मला ह्याला भेटायचं असायचं म्हणून मी त्यानंतर रोज घरी यायचे; तेव्हा मी राजन दादावरून राजनवर आले होते. नंतर ह्याच्या बहिणीने अर्चनाने त्याला सांगितलं की मला तो आवडतो, तेव्हा हा म्हणालेला नाही नाही असं काही नाही, एक वर्ष बघू. त्यानंतर तिने मला हे सांगितल्यानंतर मी म्हटलं नाही.मला असं नाही चालणार कारण मला आवडलेला हा पहिला मुलगा होता, त्यापूर्वी मला कोणीही आवडलं नव्हतं.”

प्राजक्ता पुढे म्हणाल्या, “मला तो खूप आवडायचा आणि आम्ही नातेवाईक आहोत हे नंतर कळलं. त्याने मला १८ जानेवारी ही तारीख दिलेली. तेव्हा माझी ‘मैने प्यार किया’साठी ऑडिशन सुरू होती. दोन ऑडिशन झालेल्या आणि त्यानंतर मला राजश्रीच्या ऑफिसमधून बोलावण्यात आलेलं त्याच तारखेला, पण मी तिथे गेले नाही; कारण ह्यानेही तीच तारीख दिलेली. म्हटलं हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. नंतर मी त्याच्या घरी गेले, आमच्यात गप्पा सुरू होत्या, तेव्हा कविता लाडचा नवरा तिथे होता. तो ह्याचा आतेभाऊ आहे, तो मला म्हणाला, काय झालं प्राजक्ता, राजन काही बोलला का तुला? मी म्हटलं नाही. तो म्हणाला, तुझा होकार आहे ना? मी हो म्हटल्यानंतर तो म्हणाला, मग त्याचा पण होकारच आहे असं समज आणि असं त्यांनी आमचं लग्न जुळवलं.”

कविता लाड यांच्या नवऱ्याबद्दल पुढे त्या म्हणाल्या, “मी त्याला याची परतफेड करून दिली. कविताचं आणि त्याचं लग्न मी जमवलं.” प्राजक्ता त्यांच्या पतीबद्दल पुढे म्हणाल्या, “मी त्याच्या इतकी प्रेमात होते की जर त्याच्या आई-वडिलांनी मला काम वगैरे नाही करायचं असं सांगितलं असतं तर मी तेही सोडलं असतं. पण, नशिबाने तसं झालं नाही, कारण मी काही ठरवून कुठलं काम केलं नव्हतं. पण, लहानपणापासूनच मी अभिनय करत आले आहे आणि तेव्हा माझे नातेवाईक आई-वडिलांना खूप बोलायचे की मुलीला काम करायला लावतात. पण, माझ्या वडिलांना स्वत: याची आवड होती, त्यामुळे मलाही नशिबाने कामं मिळत गेली”.