Tharla Tar Mag Fame Monika Dabade : ‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुनच्या सख्ख्या बहिणीची म्हणजेच अस्मिताची भूमिका अभिनेत्री मोनिका दबाडे साकारत आहे. अभिनेत्रीला मार्च महिन्यात मुलगी झाली. गेल्या काही महिन्यांपासून मोनिकाने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. आठव्या महिन्यांपर्यंत काम केल्यावर मोनिकाने मालिकेतून काही महिने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता.
आता अभिनेत्री पुन्हा या मालिकेत केव्हा कमबॅक करणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मोनिकाने प्रेग्नन्सीसा निर्णय, बाळाची जबाबदारी आणि मालिकेतील कमबॅक या सगळ्या गोष्टींवर अभिनेत्रीने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
मालिका प्रसिद्धीच्या शिखरावर असताना प्रेग्नन्सीसाठी ब्रेक घेणं ही मोठी गोष्ट होती याबद्दल सांगताना मोनिका म्हणाली, “कोविडच्या आधी मी
‘अस्सं सासर सुरेख बाई’ ही मालिका करत होते. त्यामुळे कोविडनंतर मला वाटलं माझ्याकडे नवीन काम येईल. पण, असं झालंच नाही…इंडस्ट्रीत काम करणं सोपं नाहीये. सतत लोकांच्या संपर्कात राहणं महत्त्वाचं आहे. अचानक सगळं काम थांबलं…आणि मला याची जाणीव झाली की, मला लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. माझ्या नशिबात ‘ठरलं तर मग’ मालिका होती आणि मग माझं काम सुरू झालं.”
“आता मालिका जरी चांगली सुरू असली तरी माझं वय ३४ झालं होतं. मातृत्वाचा निर्णय तुम्ही योग्य वयात घेतला पाहिजे असं मला वाटतं. बाळाचं करणं, बाळाला सांभाळून काम करणं या गोष्टी मला वयाच्या चाळिशीत झेपणार नाहीत. माझी एनर्जी कमी पडेल. त्यामुळे ३५ वर्षांची होण्याआधी आई व्हायचं हे मी ठरवलं होतं आणि हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा निर्णय होता. मी पैसे व्यवस्थित साठवले आणि आमची मालिका चांगली सुरू असल्याने मलाही चार लोक ओळखू लागले. अस्मिता ही भूमिका सर्वांना आवडते…मला अजूनही आम्ही तुम्हाला मिस करतो असे मेसेज येतात. त्यामुळे असा सगळा विचार करून प्रेग्नन्सीचा निर्णय घेतला. मला प्रोडक्शन हाऊस आणि चॅनेलकडून प्रचंड पाठिंबा मिळाला. आमच्या सेटवर सुद्धा खूप होमली वातावरण आहे. त्यामुळे मला खूप चांगला सपोर्ट मिळाला.” असं मोनिकाने सांगितलं.
कमबॅक करण्याविषयी मोनिका म्हणाली, “मी मालिकेत पुन्हा कधी येईन याची मला निश्चित तारीख माहिती नाहीये. पण, मी त्यांना ५ मे ही तारीख दिली होती. की, त्यानंतर मी कधीही यायला तयार आहे. बाळाला सव्वा महिना झाल्यावर दहा दिवसांची गॅप घे आणि त्यानंतर काम सुरू कर असं माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मी बाळाच्या झोपेचं सायकल, सेटवर तिच्यासाठी मला काय-काय घेऊन जावं लागेल या सगळ्या गोष्टींची तयारी सुरू केली आहे.”