Colonel Sofia Qureshi And Wing Commander Vyomika Singh: काश्मीर येथील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २६ पर्यटकांना आपला जीव गमावावा लागला होता. त्यावेळी धर्म विचारून पर्यटकांवर गोळीबार करण्यात आल्याचे समोर आले होते.
बुधवारी पहाटे भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या काही तळांवर हल्ले केले आहेत. लष्करी कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर भारतीय लष्कराने पत्रकारांशी संवाद साधताना या हल्ल्याबाबत माहिती दिली. कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी ही माहिती दिली.
मराठी अभिनेत्याकडून कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांचे कौतुक
आता अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह यांचे कौतुक केले आहे. तसेच भारतीय लष्कराचा हा सर्जिकल स्ट्राईक खूप सूचक होता, असेही त्यांनी लिहिले.
किरण माने यांनी कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी लिहिले, “कर्नल सोफिया कुरेशी या आपल्या भगिनीनं भारतानं केलेल्या कारवाईची माहिती मीडियाला दिली. तिच्याबरोबर विंग कमांडर व्योमिका सिंह होती. हा लष्कराचा सर्जिकल स्ट्राईक खूप सूचक होता.
“आपल्या देशात एका विषारी पिलावळीनं मुस्लीम द्वेष पसरवून दुही माजवण्याचे रचलेले सगळे मनसुबे यामुळे आज उद्ध्वस्त झाले. ‘धर्म विचारला…’ या नरेटिव्हच्या चिंध्या-चिंध्या उडाल्या. त्या पाकिस्तानला तर गाडायचेच आहे, पण त्याचबरोबर आपल्या भूमीतले मानवतेचे आणि देशाचे दुश्मनही ठेचायचे आहेत. हा ‘संकेत’ अभिमानाने काळजात जपून ठेवावा असा होता.”
पुढे किरण माने यांनी लिहिले, “या दोघींचा हा फोटो भारताच्या इतिहासातल्या हिंदू-मुस्लीम सलोख्याच्या परंपरेतला सगळ्यात शक्तिशाली आणि सुंदर फोटो आहे. हा आमचा भारत देश आहे.”
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील बहावलपूर, मुरिदके, गुलपूर, भीमबर, चम अमरू, बाग, कोटली, सियालकोट, मुजफ्फराबाद या नऊ ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला गेला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर मराठीसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, किरण माने अभिनयाबरोबरच त्यांच्या वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असतात. ते अनेक राजकीय-सामाजिक विषयांवर वक्तव्य करताना दिसतात.