Navri Mile Hitlerla Upcoming Twist: मालिकांमधील ट्विस्ट प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतात. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. आता ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत नवीन वळण आल्याचे दिसत आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत एजे व लीला हे पती-पत्नी असल्याचे पाहायला मिळते. लीला ही एजेची दुसरी पत्नी आहे. वयाने कमी असलेली लीला सासू म्हणून दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांना मान्य नाही. एजेचा मुलगा किशोर व त्याची पत्नी दुर्गा यांना एजे व लीलाला दूर करायचे आहे. दुर्गाच्या मनात लीलाला घरातून बाहेर काढायचे आहे आणि किशोरला एजेला संपूर्णपणे उद्ध्वस्त करायचे आहे. कारण- किशोरला वाटते की, एजेमुळे त्याला त्याचे हक्क मिळाले नाहीत. त्यामुळे तो सतत एजेविरुद्ध कट-कारस्थान करताना दिसतो. दुर्गादेखील त्याला मदत करताना दिसते.

काही दिवसांपूर्वीच एजेची पहिली पत्नी अंतरा जहागीरदारांच्या कुटुंबात परतली आहे. तिच्या येण्याने लीला आता घरातून बाहेर जाईल, अशी आशा सुनांना वाटत आहे. या सगळ्यात आजी मात्र लीलावर प्रचंड प्रेम करते, तिला जपते. अभिराम व लीलाचे नाते टिकावे, यासाठी प्रयत्न करते. आता मात्र मालिकेत ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे.

आजी व लीला यांच्यात दुरावा येणार का?

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, किशोर दुर्गाला एक फाईल देतो आणि तिला म्हणतो, “रिपोर्ट्स तुझ्यासमोर आहेत. लीला कधीही आई होऊ शकत नाही. हे १०० टक्के खरं आहे. दुर्गा तुला आता हे रिपोर्ट्स आजीच्यासमोर नेऊन ठेवायचे आहेत. तिला नातवंडं बघायची खूप घाई झालीय. पण, आता हे रिपोर्ट्स बघून आजीला एवढा मोठा धक्का बसेल की, तिच्या मनातील लीलाबद्दलचं सगळं प्रेम निघून जाईल.” किशोरच्या सांगण्यावरून दुर्गा ती फाईल आजीच्या कपाटात ठेवते. आजी ती फाईल पाहते. तिला मोठा धक्का बसतो. दुसरीकडे लीलादेखील रडत असल्याचे दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘लीला कधीच आई होऊ शकत नाही’, अशी कॅप्शन दिली आहे.

दरम्यान, नुकतेच एजेने किशोरकडे बिझनेसची जबाबदारी दिल्याचे पाहायला मिळाले. तो एजेविरुद्ध काय कट करणार? तसेच आता आजीसमोर लीलाचे हे सत्य आल्यानंतर ती लीलाला दूर करणार का? मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.