Manasi Kulkarni on Single Parenting: अभिनेत्री मानसी कुलकर्णी सध्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली असली तरी तिच्या या भूमिकेचे मोठे कौतुक होताना दिसत आहे.

आता अभिनेत्री तिच्या अभिनयामुळे नाही तर तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच मानसीने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सिंगल पॅरेटिंग, ती १० वर्षे टेलिव्हिजनपासून दूर का होती अशा खासगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल वक्तव्य केले.

मानसी कुलकर्णी म्हणाली…

मानसी तिच्या मुलीला सांभाळत असून सिंगल पॅरेटिंगबद्दल तिने मुलाखतीत वक्तव्य केले. अभिनेत्री म्हणाली, “सिंगल पॅरेटिंग करत असताना आपल्याला अनेकदा वाकडेपणा घ्यावा लागतो. कारण- आजी-आजोबा असलेल्या घरात लहान मुले असतील, तर त्यांचे खूप लाड होतात. पण, जबाबदारी आपली असते. भविष्यात जर तिच्याबाबतीत किंवा तिच्याकडून काही घडलं तर पालक म्हणून माझ्यावर ती जबाबदारी येणार. आईचं लक्ष कमी होतं, असं म्हटलं जाईल.

“सिंगल पॅरेटिंगबरोबर खूप जबाबदाऱ्या येतात. सामान्य कुटुंबातील एखादा मुलगा गैरजबाबदारपणे वागला. लोकं त्यांच्याबद्दलही बोलतात. पण, एकटा पालक मुलाला सांभाळत असेल तर लोक म्हणतात की ही एकटीच आहे. जबाबदारी घेत नाही, म्हणून असं होतं.समाजातून अशा पद्धतीनं डिवचलं जातं. त्यामुळे डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावं लागतं.

“पालक म्हणून मला असं वाटतं की माझी मुलगी ही व्यवस्थित असायला हवी. उद्या समाजात वावरताना कोणी तिच्यावर बोट उचलू नये. त्यामुळे मी जास्त जागरुक असते. मुलांना शिस्त लावण्याचा जेव्हा मुद्दा येतो, त्यावेळी आपल्याला थोडं कठोर व्हावं लागतं. मी तिला ओरडताना मला वाईट वाटतं, पण, थोडं कठोर व्हावं लागतं. कारण-तिला कळलं पाहिजे की अमुक एखादी गोष्ट चुकीची आहे. मी ओरडत असताना तिचे आजी-आजोबा पाठीशी घालत असतील तर तिला वाटू शकतं की मी केलेली गोष्ट बरोबर आहे. आई काहीतरी वेगळं वागत आहे. हे माझ्या आई आणि सासू-सासऱ्यांकडे दोघांकडे होते. त्यामुळे तिथे थोडसा विरोध करावा लागतो.

“आई किंवा सासू-सासऱ्यांना सांगावं लागतं की माझं तिला ओरडणं हे तिच्या चांगल्यासाठी आहे. आपल्याला वाकडेपणा घ्यावा लागतो. मी माझ्या मुलीच्या भल्यासाठी कोणाशीही वाकडं घेऊ शकते. मला कोणा किती काहीही म्हटले त्याने मला अजिबात फरक पडत नाही. मला माझ्या ग्रुपमधील अनेकजण म्हणतात की तू जरा अतीच करतेस. माझ्या मुलीचे आरोग्य आणि तिच्या भविष्यासाठी मी कठोर वागणं मला योग्य वाटतं. त्यामुळे कोणाकडून माझ्याकडे वाकडेपणा येणार असेल, तर तो मला मान्य आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.