Thoda Tuza Ani Thoda Maza Serial : स्टार प्रवाहवरील सर्वच मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. या वाहिनीवरील मालिकांना प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो. अशातच गेल्या वर्षी १७ जून रोजी स्टार प्रवाहवर नवी मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही प्रेक्षकांच्या भेटीला आली. स्टार प्रवाहच्याच गाजलेल्या ‘देवयानी’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि ‘गोठ’ मालिकेमधून लोकप्रियता मिळालेला अभिनेता समीर परांजपे ही जोडी या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आली आहे.
शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे यांच्यासह मानसी कुलकर्णीदेखील या मालिकेत आहे. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेच्या निमित्ताने या तिन्ही मुख्य कलाकारांनी बऱ्याच वर्षांनंतर स्टार प्रवाहवर पुनरागमन केलं. या मालिकेच्या निमित्ताने मानसीने तब्बल १० वर्षांनंतर मालिकाविश्वात पदार्पण केलं, तर शिवानी सुर्वेही तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा मालिकेत पाहायला मिळाली. नात्यांची हळुवार गोष्ट उलगडणाऱ्या या लोकप्रिय मालिकेला आज १७ जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण झालं आहे.
मालिकेच्या वर्षपूर्तीनिमित्त अभिनेत्री शिवानी सुर्वेने एक खास पोस्ट शेअर केली आहे. शिवानीने इन्स्टाग्रामवर मालिकेचं पोस्टर शेअर करत असं म्हटलं, “१७ जून. ‘थोडं तुझं थोडं माझं’ मालिकेची वर्षपूर्ती. थोड्या थोड्या क्षणांसह आमच्या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं. सर्वप्रथम, मानसीसह माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल स्टार प्रवाहचे आभार. २०१२ पासून आमचा एकत्र प्रवास सुरू झाला आणि स्टार प्रवाहबरोबर आणखी एका सुंदर मालिकेचा भाग झाल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.”
अनेक गोड आठवणीही निर्माण केल्या : शिवानी सुर्वे
यानंतर तिने असं म्हटलं, “मालिकेतील माझे सर्वच सहकलाकार अतिशय वेडे आहेत; पण तितकेच मेहनतीसुद्धा आहेत. आम्ही फक्त मालिकेच्या भागांचं शूटिंग केलं नाही, तर आयुष्यभर जपून ठेवाव्या अशा अनेक गोड आठवणीही निर्माण केल्या आहेत. त्याचबरोबर आमच्या सर्व प्रेमळ प्रेक्षकांचेसुद्धा मनापासून आभार. या मालिकेवर इतका विश्वास आणि प्रेम दाखवल्याबद्दल तसंच मालिकेच्या प्रत्येक टप्प्यावर आमच्याबरोबर राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.”
प्रेक्षकांचं प्रेम हेच आमच्या काम करण्याचं कारण : शिवानी सुर्वे
यापुढे शिवानी असं म्हणते, “तुम्हा प्रेक्षकांचं प्रेम हेच आमच्या उत्तम काम करण्याचं कारण आहे. यापुढेही ‘थोडं तुझं थोडं माझं’ या मालिकेवर असंच प्रेम करत राहा.” दरम्यान, शिवानीच्या या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या पोस्टच्या कमेंट्समध्ये चाहत्यांनी वर्षपूर्तीनिमित्त अभिनंदन म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच शिवानी सुर्वेला तुझी भूमिका तसंच ही मालिका खूप आवडत असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.