TMKOC Fame Neha Mehta New Show : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यातील प्रत्येक पात्राचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. परंतु, मागच्या काही वर्षांत अनेक कलाकारांनी या कार्यक्रमातून एक्झिट घेतली. त्यापैकीच एक होती अभिनेत्री नेहा एस. के. मेहता.
नेहानं अनेक वर्षं ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये अंजली मेहता ही भूमिका साकारली. त्यातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. त्यामुळे तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. आजही प्रेक्षक तिला या मालिकेत पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तिच्या एक्झिटनंतर अभिनेत्री सुनयना अंजलीचं पात्र साकारत आहे.
नेहानं २०२० मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत तब्बल १२ वर्षं काम केल्यानंतर त्यामधून एक्झिट घेतली. तिच्यानंतर पुढे शैलेश लोढा म्हणजेच तारक मेहता हे पात्र साकारणारे अभिनेते त्यांनीसुद्धा २०२२ मध्ये मालिकेचा निरोप घेतला. या दोघांच्या एक्झिटनंतर आता मालिकेत सचिन श्रॉफ व सुनयना ही दोघं ही पात्रं साकारत आहेत. परंतु, नेहाची आता नवीन मालिकेत एन्ट्री झाली आहे.
‘सब टीव्ही’वरील ‘या’ मालिकेत झळकणार नेहा मेहता
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये अंजली हे पात्र साकारल्यानंतर नेहा आता नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. महत्त्वाचं म्हणजे ती ‘सब टीव्ही’वरीलच एका मालिकेत झळकत आहे. नेहानं याच वाहिनीवरील ‘इत्तीसी खुशी’ या मालिकेतून ‘सब टीव्ही’वर कमबॅक केलं आहे. त्यात ती हेतल हे नवीन पात्र साकारताना दिसणार आहे.
नवीन मालिका व त्यातील भूमिकेबद्दल नेहानं नुकतीच प्रतिक्रियाही दिली आहे. Buzzzooka Spotlightला दिलेल्या मुलाखतीत तिनं याबद्दल सांगितलं आहे. नवीन मालिकेबद्दल नेहा म्हणाली, “मुलगी सासरी गेल्यानंतर किंवा परदेशात गेल्यानंतर तिच्या घरून कोणाचाही फोन जरी आला तरी तिला आनंद होतो. तसंच ‘सब टीव्ही’ माझ्या घरासारखंच आहे. मला फोन आला आणि सांगण्यात आलं की, खूप वेगळं, उत्साही असं पात्र साकारण्याची संधी आहे. तुम्हाला असं पात्र साकारायला आवडेल का? मी हो म्हटलं. कारण- ‘सब टीव्ही’ची मालिका आहे यापेक्षा जास्त अजून काय हवं.”
मालिकेतील भूमिकेबद्दल नेहा पुढे म्हणाली, “या मालिकेतील भूमिकेसाठी मला थोडी तयारी करावी लागली. कारण- हे पात्र थोडं वेगळं आहे. स्क्रीनवर एरव्ही आईच्या भूमिका अशा असतात की, त्यात आई फक्त चांगली, सोज्वळ वगैरे अशी दाखवली जाते. पण खऱ्या आयुष्यात आई कशी असते, रागावणारी आहे का, प्रेमळ आहे की नेमकी कशी? असंच हे पात्र वेगळं आहे. हेतल खूप वेगळी, उत्साही आहे.”