Tu Hi Re Maza Mitwa Fame Abhijit Amkar Talks About Marriage : ‘तू ही रे माझा मितवा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. यामध्ये अभिनेत्री शर्वरी वाघ व अभिनेता अभिजीत आमकर मुख्य भूमिका साकारत आहेत. नुकतंच या मालिकेत दोघांचं लग्न झालेलं पाहायला मिळालं. अशातच आता अभिजीतने खऱ्या आयुष्यात लग्न करण्याबद्दल सांगितलं आहे.

अभिजीत आमकर खऱ्या आयुष्यात अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरला डेट करत आहे. दोघे अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना ते कधी लग्न करणार याबद्दल उत्सुकता आहे. अशातच आता अभिजीतला याबद्दल एका मुलाखतीत विचारल्यानंतर त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिजीत आमकरची खऱ्या आयुष्यात लग्न करण्याबद्दल प्रतिक्रिया

अभिजीत व शर्वरी यांनी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे. यादरम्यान अभिजीतला खऱ्या आयुष्यात कधी लग्न करणार याबद्दल विचारलं होतं. याबद्दल तो म्हणाला, “मी विचार केला आहे बऱ्याचदा, म्हणजे याबद्दल विचार केलाच आहे. पण असंही नाही की ही मालिका संपल्यानंतर करेन, कारण ही मालिका कधीच संपू नये असं मला वाटतं. अविरत चालू राहावी.”

पुढे अभिजीतला तू लग्न केल्यानंतर अनेक मुलींचा हार्टब्रेक होणार आहेत असं सांगितलं. त्यावर तिथे उपस्थि असलेली शर्वीर अभिजीतबद्दल म्हणाली, “खूप मुलींची, कारण- मला असे मेसेज येतात की, अभिजीतला रिप्लाय करायला सांगा ना किंवा माझ्या ज्या ओळखीच्या मैत्रिणी आहेत त्या म्हणतात की, त्याला व्हिडीओ कॉल लावून दे ना वगैरे.”

अभिजीतप्रमाणे नक्षत्रा मेढेकरसुद्धा अभिनयक्षेत्रात सक्रिय असून तिनेही अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. नक्षत्राने ‘लेक माझी लाडकी’, ‘माझिया माहेरा’, ‘चंद्र आहे साक्षीला’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

दरम्यान, ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत अर्णव व इश्वरीचं नातं खुलताना दिसत आहे. अलीकडेच त्यांचं लग्न झालेलं पाहायला मिळालं. परंतु, प्रेक्षकांमध्ये आता इश्वरी अर्णवच्या प्रेमात कधी पडणार आणि त्यांच्यात चांगले संबंध कधी निर्माण हाणार, याबद्दल उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते.