Abhijit Aamkar Birthday Celebration Video : स्टार प्रवाह काही लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका. या मालिकेतली अर्णव-ईश्वरी ही जोडी आता प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना आवडत आहे. मालिकेत अर्णव ही भूमिका अभिनेता अभिजीत आमकर साकारत आहे. आपल्या अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो.

अभिजीत सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असतो. अशातच त्यानं वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिजीत आमकरचा १८ ऑक्टोबर रोजी वाढदिवस झाला आणि या वाढदिवसाचं सेटवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. याचीच एक झलक त्यानं सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसंच त्यानं आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेच्या सेटवर कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींनी अभिजीतच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं. या व्हिडीओमध्ये केक, फुलांची सजावट आणि दिव्यांची रोषणाई केल्याचं पाहायला मिळत आहे. अभिजीतच्या वाढदिवसाच्या या खास सेलिब्रेशनचं प्लॅनिंग शर्वरी जोग, मधुरा जोशी आणि मालिकेच्या पूर्ण टीमनं केलं होतं. यावेळी अभिजीतला चाहत्यांनी सेटवर खास गिफ्टसुद्धा दिलं.

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनने आणि चाहत्यांच्या खास गिफ्ट्समुळे अभिजीत भारावून गेला असून याबद्दल त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर करीत अभिजीत म्हणतो, “किती छान दिवस होता… सेटवरचे सेलिब्रेशन, अचानक झालेल्या भेटी, केक कटींग आणि खूप सारी धमाल मजामस्ती. सगळं काही एखाद्या सिनेमाच्या क्लायमॅक्ससारखं वाटलं… माझे जवळचे लोक, माझी टीम, माझे प्रेक्षक आणि ज्यांच्यामुळे माझा वाढदिवस आनंदात गेला, त्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार.”

अभिजीत आमकरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ

या व्हिडीओसह अभिजीतनं शर्वरी आणि त्याच्या अनेक सोशल मीडियावरील फॅन पेजेसना टॅग केलं आहे आणि सर्वांचे आभार मानले आहेत. तसंच त्यानं शेअर केलेल्या या व्हिडीओला लाईक्स आणि कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. यासह मालिकेत काम करणाऱ्या सहकलाकारांनीदेखील या व्हिडीओवर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत नुकतंच अर्णव-ईश्वरी यांचं लग्न पार पडलं आहे. ईश्वरी या लग्नाला आधी तयार नव्हती, मात्र राकेशचा खरा चेहरा समोर येताच तिला अर्णवची बाजू कळली आहे. मालिकेत सध्या दिवाळसणाचा आनंद पाहायला मिळत आहे. दोघे एकमेकांना खंबीर साथ देत राकेशच्या डावपेचांना खंबीरपणे सामोरे जात आहेत.