Abhijit Amkar Girlfriend Shares Post: स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील अर्णव-ईश्वरी यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. अर्णव-ईश्वरी यांचं मालिकेत नुकतंच लग्नही पार पडलं आहे. त्यामुळे नवरा-बायको म्हणून या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. ‘तू ही रे माझा मितवा’मधील या अर्णव म्हणजेच अभिजीत आमकरचा आज वाढदिवस आहे आणि त्याच्या या वाढदिवसानिमित्त एका खास व्यक्तीने एक पोस्ट शेअर केली आहे.

अर्णव म्हणजेच अभिजीत आमकरच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती म्हणजे त्याची गर्लफ्रेंड नक्षत्रा मेढेकर. अभिजीत आमकर खऱ्या आयुष्यात लोकप्रिय अभिनेत्री नक्षत्राला डेट करीत आहे. दोघे एकमेकांबरोबरचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असतात. अशातच अभिजीतसाठी नक्षत्रानं सोशल मीडियावर रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीनं वाढदिवसानिमित्त अभिजीतबरोबरचे काही खास फोटोसुद्धा शेअर केले आहेत.

या पोस्टमध्ये नक्षत्रा अभिजीतसाठी प्रेम व्यक्त करीत लिहिते, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मला तुझा किती अभिमान वाटतो, याची तुला कल्पनाही नाही. तू इतका मेहनत घेतोस, थकतोस तरी थांबत नाहीस. हे सगळं पाहिलं की, तुझ्यावरचं प्रेम अजूनच वाढतं. तुझं कामाप्रति असलेलं प्रेम, ती निष्ठा आणि स्वतःला रोज अधिक चांगलं बनवायचा तुझा प्रयत्न… हे खरंच खूप प्रेरणादायी आहे. आपण सध्या फारसं बोलू शकत नसलो; तरी माझ्या डोक्यात सतत तुझे आणि तुझेच विचार असतात.”

त्यानंतर ती म्हणते, “तू तुझी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी झटतोस, ही कल्पनाच माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. तू माझ्यासाठी सगळं काही आहेस… आणि तुझ्यावर प्रेम करणं हे इतकं नैसर्गिक आणि सुंदर वाटतं आहे की, ते शब्दांत सांगता येणार नाही. मी तुला दररोज मिस करते; पण मला माहितीय की, ही वेळही निघून जाईल… आणि जेव्हा ती संपेल, तेव्हा मी तुझ्यासाठी कायम इथेच असेन. कदाचित तेव्हा मी आतापेक्षा तुझ्या अधिक जास्त प्रेमात असेन.” नक्षत्राच्या या पोस्टखाली कमेंट्समध्ये अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांच्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच अभिजीतला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.

नक्षत्रा मेढेकरची इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, अभिजीतची गर्लफ्रेंड नक्षत्रासुद्धा मराठी मनोरंजन विश्वातली लोकप्रिय अभिनेत्री आहे. नक्षत्रानं मालिका आणि सिनेमांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. नक्षत्रा ‘लेक माझी लाडकी’, ‘चंद्र आहे साक्षीला’सारख्या अनेक मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्याशिवाय तिनं मराठी सिनेमांतही काम केलं आहे.