Tula Japnar Ahe Fame Manoj Kolhatkar Talks About The Show : मनोज कोल्हटकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. मराठीसह त्यांनी हिंदी मालिकाविश्वातही विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या ते ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला जपणार आहे’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. अशातच आता त्यांनी त्यांच्या या भूमिकेबद्दल सांगितलं आहे.
मनोज कोल्हटकर सध्या ‘तुला जपणार आहे’मध्ये शिवनाथ ही भूमिका साकारत आहेत. त्यांची शिवनाथ ही भूमिका त्यांनी आजवर साकारलेल्या भूमिकांपासून खूप वेगळी आहे. अशातच त्यांनी ‘झी मराठी अवॉर्डस २०२५’ या सोहळ्यादरम्यान रेड कार्पेटवर हजेरी लावलेली. यावेळी त्यांनी ‘टेली गप्पा’ला मुलाखत दिली होती, ज्यामध्ये त्यांनी या मालिकेतील त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितलं आहे.
मनोज कोल्हटकर यांना मुलाखतीत पुरस्कार सोहळ्याबद्दल, भूमिकेबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर ते म्हणाले, “पुरस्कार सोहळा हा कलाकारांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतोच. कारण- त्यांनी खूप कष्ट केलेले असतात आणि मग सन्मानाचा एक क्षण असतो. पुरस्कार मिळतो, कधी नॉमिनेशनवर समाधान मानावं लागतं; पण ते एक प्रोत्साहन असतं की, तुम्ही जे काही करीत आहात ते रसिकांपर्यंत पोहोचत आहे.”
मालिकेबद्दल अभिनेते पुढे म्हणाले, “मालिका खूप छान सुरू आहे. लोकांना खूप आवडतेय. वेगळा जॉनर आहे. मला मराठीत खूप वर्षांनंतर काहीतरी वेगळं करायला मिळालं आहे. हिंदीत मी बऱ्यापैकी केलं आहे; पण मराठीत जरा एकाच पठडीतल्या भूमिका मिळाल्यानंतर आता काहीतरी वेगळं वाट्याला यायला लागलं आहे. त्यामुळे मला दोन नॉमिनेशन आहेत यासाठी. एक उत्कृष्ट बाबा आणि एक उत्कृष्ट भूमिका. ‘झी मराठी’नं मला पूर्वीच जानूचा बाबा म्हणून उत्कृष्ट बाबा बनवलं आहे आणि उत्कृष्ट भूमिकेसाठी कोणाला पुरस्कार मिळणार हे अजून कळायचं आहे.” मनोज कोल्हटकर यांनी याच वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेत जान्हवीच्या म्हणजेच तेजश्री प्रधानच्या वडिलांची भूमिका साकारलेली.
मनोज कोल्हटकर यांनी ‘तुला जपणार आहे’साठी १२-१४ वेळा केलेली लूक टेस्ट
‘तुला जपणार आहे’मधील शिवनाथच्या भूमिकेबद्दल मनोज कोल्हटकर म्हणाले, “शिवनाथच्या भूमिकेसाठी माझ्या १२ ते १४ लूक टेस्ट केल्या गेल्या होत्या. त्यादरम्यान मी खरं तर कंटाळलो होतो. की, अरे यार हे संपतच नाहीये. जोपर्यंत माझा लूक ठरत नाही तोपर्यंत ती भूमिका पुढे कशी नेणार? तर निर्माते सगळं ट्रायल करीत होते. पण आता मला कळतंय की, ते किती गरजेचं होतं. वेगवेगळे कपडे, मेकअप, दाढी असं खूप काही करून पाहिलं. एक दिवस मलाच आश्चर्यामध्ये पाहुन कळलं की, हाच तो लूक आहे. त्याच वेळी निर्मात्यांकडूनही हाच प्रतिसाद आला की, हो अशा पद्धतीने हा लूक ठेवूयात. पण जेव्हा मालिका सुरू झाली आणि लोकांची त्याला पसंती मिळत असल्याचं दिसलं तेव्हा छान वाटलं आणि म्हणूनच ही भूमिका करताना खूप मजा आली.”
मनोज यांनी पुढे या भूमिकेबद्दलचा एक किस्साही सांगितला आहे. ते म्हणाले, “मी लूकमध्ये होतो तेव्हा कोणीच ओळखलं नव्हतं. पहिल्या दिवशी जेव्हा मी लूक पूर्ण करून सेटवर बसलो होतो. तेव्हा चहा द्यायला जो प्रॉडक्शनचा माणूस असतो त्यानंही माझ्याकडे बघितलं नव्हतं. त्याला वाटलेलं की, हा कोणीतरी चुकून येऊन बसलाय. नंतरही बराच काळ अनेकांनी मला ओळखलं नव्हतं.”