रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित ‘उंच माझा झोका’ ही मालिका ५ मार्च २०१२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. ऐतिहासिक काळ, रमाबाईंचं जीवन, या मालिकेचं शीर्षक गीत या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. या मालिकेचं शीर्षक गीत आजही अनेकांच्या मोबाइलची रिंगटोन आहे, यावरून ‘उंच माझा झोका’ची क्रेझ किती मोठ्या प्रमाणात होती हे लक्षात येतं.

‘उंच माझा झोका’ या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका अभिनेत्री तेजश्री वालावलकरने साकारली होती. शाळा, अभ्यास, परीक्षा या सगळ्या गोष्टी सांभाळून तेजश्रीने या मालिकेत काम केलं होतं. तिच्या सहज सुंदर अभिनयाने तेजश्रीने सर्वांचं मन जिंकून घेतलं होतं. ही मालिका संपल्यावर ती कलाविश्वापासून काहीशी दूर झाली. सध्या प्रेक्षकांची ही लाडकी रमा काय करतेय जाणून घेऊयात…

तेजश्री वालावलकरने नुकतीच ‘कलाकृती मीडिया’ला मुलाखत दिली. यावेळी तिने सध्या ती काय करतेय याची माहिती दिली. तेजश्री म्हणाली, “मी सध्या पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला यायला सज्ज होतेय. लवकरच तुम्हा सर्वांच्या समोर अनेक गोष्टी येतील. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना एका वेगळ्या रुपात मी भेटणार आहे.” यावरून ती पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टीत पुनरागमन करेल अशी हिंट चाहत्यांना मिळाली आहे.

मधल्या काळात अभिनय क्षेत्रापासून दूर का होती? याबद्दल सांगताना तेजश्री म्हणाली, “रमाबाईंची इमेज प्रेक्षकांच्या मनावर ठसली होती. त्यामुळे तेजश्रीची ओळख रमाबाईच अशी झाली होती, त्यात माझंही वय कमी होतं. हा सगळा विचार करून काही वर्षे ब्रेक घेतला. कारण, फक्त काहीतरी काम करायचं म्हणून मिळाली ती भूमिका घेतली असं मला करायचं नव्हतं. मला माझ्या आवडत्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर यायचं होतं, अर्थात त्याचीच वाट पाहत मी एवढी वर्षे थांबले होते… लवकरच आपली भेट होईल. आता स्वामींच्या आशीर्वादाने मी पुन्हा पुनरागमन करतेय ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘उंच माझा झोका’ या मालिकेत छोट्या रमाच्या भूमिकेत तेजश्री झळकली होती. तर, लीपनंतर या मालिकेत रमबाईंच्या भूमिकेसाठी स्पृहा जोशीची एन्ट्री झाली होती.