मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. त्या कायम ठामपणे त्यांचं मत मांडत असतात. उषा नाडकर्णी यांनी आजवर अनेक हिंदी-मराठी चित्रपट व मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमध्ये त्यांनी सविता देशमुख ही भूमिका साकारली होती. यामुळे त्यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी प्रेक्षकांचीही मनं जिंकली होती. यासह उषा ‘बिग बॉस’ मराठीमध्येही झळकल्या होत्या.

‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्याच पर्वात उषा नाडकर्णी सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्या ‘बिग बॉस’च्या घरातील त्यांच्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत आल्या. अशातच आता नुकतंच त्यांनी ‘पिंकव्हिला’ला मुलाखत दिली, यामध्ये त्यांनी ‘बिग बॉस’ मराठीच्या घरातील त्यांचे अनुभव सांगितले आहेत.

‘पिंकव्हिला’शी संवाद साधताना त्या म्हणाल्या, “मी ‘बिग बॉस’च्या घरात ७७ दिवस होते. त्या घरात राहणारे लोक वेडे होतात. जेव्हा ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आले तेव्हा मी बऱ्याच गोष्टी विसरले होते. मी माझा टेलिफोन नंबरसुद्धा विसरले होते. त्या घरात असताना बाहेरच्या जगाशी तुमचा काहीही संपर्क राहत नाही. मला जर पुन्हा बोलावलं तर मी अजिबात जाणार नाही.”

उषा नाडकर्णी यांच्यासह ‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या पर्वात अभिनेता अस्ताद काळे, मेघा धाडे, सई लोकुर, पुष्कर जोग, जुई गडकरी, शर्मिष्ठा राऊत, स्मिता गोंदकर यांसारखे अनेक कलाकार सहभागी झाले होते. तर मेघा धाडे या पर्वाची विजेती ठरली होती.

उषा नाडकर्णी यांचा साधा, सरळ पण स्पष्ट स्वभाव अनेकांना भावतो. त्या नेहमी कुठल्याही विषयावर भाष्य करताना स्पष्ट मत मांडताना दिसतात. पडद्यावर जरी त्यांनी अनेकदा खलनायिकेची भूमिका साकारली असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र त्या निर्मळ व प्रेमळ स्वभावाच्या असल्याचं म्हटलं जातं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उषा नाडकर्णी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आजवर ‘माहेरची साडी’, ‘हुप्पा हुइय्या’, ‘रुसतम’, ‘देऊळ’, ‘फसक्लास दाभाडे’, ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’, ‘पवित्र रिश्ता’ यांसारख्या कलाकृतींमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तर नुकत्याच त्या ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’ या कार्यक्रमात झळकल्या होत्या.