Vaishnavi Hagawane Death Case : पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणेने हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवीने स्वत:चं जीवन संपवलं. वैष्णवी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) गटाच्या पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. १६ मे, २०२५ रोजी तिनं आत्महत्या केली.
वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे आणि याप्रकणी आता तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राजकीय क्षेत्राबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील कलाकार मंडळी या घटनेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अभिनेता हेमंत ढोमेने याप्रकणी ‘आजच्या काळात हुंडाबळी गेलाय’ असं म्हणत ‘महाराष्ट्रात तरी अशा घटना होऊ नयेत म्हणून आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे’ अशी मागणी केली.
त्यानंतर आता या घटनेबद्दल अभिनेत्री अश्विनी महांगडेने तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अश्विनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने असं म्हटलं आहे, “ही माणसं शिकलेली, पैशाने श्रीमंत असली तरीही मानसिकता… सुनेला मारहाण करून, दरवेळी माहेरकडून काहीना काही आणायला सांगणे ही क्रूर बाब आहे आणि आरोपींना योग्य ती शिक्षा व्हायला हवी.”

यापुढे अश्विनीने असं म्हटलं, “आता जर हे प्रकरण दाबले, तर पुन्हा एकदा पैसे आणि पद यांचा विजय होईल आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. यावर आताच वचक बसणे गरजेचे आहे.” यासह तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा उल्लेख करत “आपलीच लाडकी बहीण” असं म्हटलं आहे. शिवाय या घटनेचा जाहीर निषेधही अश्विनीने व्यक्त केला आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, २८ एप्रिल २०२३ रोजी वैष्णवी-शशांक यांचा येथे प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. पण नंतरही वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं. वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.