Veen Doghantali hi Tutena Fame Raj More Talks About Future Wife : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. तेजश्री प्रधान व सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेत मराठीतील इतर काही लोकप्रिय कलाकारही पाहायला मिळत आहेत. सध्या मालिकेत स्वानंदी-समर आणि रोहन-अधिरा यांचा लग्न सोहळा पाहायला मिळत आहे. अशातच आता रोहनने त्याला खऱ्या आयुष्यात कशी बायको हवी आहे याबद्दल सांगितलं आहे.

‘वीण दोघांतलीही तुटेना’ मालिकेत रोहनची भूमिका साकारणारा अभिनेता राज मोरे सध्या या मालिकेमुळे चर्चेत आहे. राज खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला ते ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेमुळे. त्यामध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली. याही मालिकेत अभिनेत्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या मालिकेत त्याचा म्हणजेच रोहन व अधिराचा लग्न सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

राज मोरेला हवी आहे ‘अशी’ बायको

राजने यावेळी ‘अल्ट्रा मराठी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये मालिकेत रोहनच्या खूप अटी होत्या, पण राजच्या खऱ्या आयुष्यात होणाऱ्या बायकोसाठी काही अटी आहेत. कशी बायको हवी आहे असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “माझ्या अशा काही अटी नाही, पण ती खरी असावी आणि प्रेमाच्या बाबतीत व्यक्त होणारी असावी. अधिरा जसं खूप जीवापाड प्रेम करते, ती चांगलीच गोष्ट आहे; पण नस वगैरे कापून घेणारी इतकं पण अधिरासारखं नको. अशा फार काही अटी नाही, पण ती मनाने छान असावी ही महत्त्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी.”

‘वीण दोघांतलीही तुटेना’ मालिकेतील समर व स्वानंदीबरोबरच रोहन व अधिरा यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा प्रेक्षकांना आवडत असल्याचं पाहायला मिळत आहे. या मुलाखतीत रोहन व अधिरा यांनी म्हणजेच पूर्णिमा डे व राज मोरेने मालिकेचं लग्नानिमित्त गोव्यात शूटिंग सुरू असताना किती मजा केली याबद्दल सांगितलं आहे.

राज म्हणाला, “खूप ऊन होतं, पण सगळ्यांनी उत्सुकतेने शूट केलं. आता ते बोलताना खूप सोपं वाटतंय, पण तसं नाहीये. पण, खूप मजा आली. सगळ्या सहकलाकारांबरोबर काम करताना मजा आली. सीनसाठी सगळेच रेडी असायचे. आम्ही खूप मासे खाल्ले. टीममध्ये सगळ्यांना मासे खायला खूप आवडतात.”