Veen Doghantali He Tutena Fame Raj More Talks About Struggling Day’s : राज मोरे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. तो खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला ते ‘झी मराठी’वरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेमुळे. सध्या राज याच वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. अशातच त्यानं इंडस्ट्रीत नवीन असतानाचे, ऑडिशन देतानाचे त्याचे अनुभव सांगितले आहेत.
राजनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीतत्याच्या नावामागे तो त्याच्या आईचं नाव का लावतो याबद्दलही सांगितलं आहे. राजनं नुकतीच ‘स्पील द टी विथ सरतापेस’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यानं त्याच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं आहे. राजनं मुलाखतीत त्याला क्रिकेटचीही आवड होती आणि तो क्रिकेट खेळायचा. परंतु,लॉकडाऊननंतर ते बंद झाल्याचं त्यानं म्हटलं.
…म्हणून नावामागे लावतो आईचं नाव
राज मोरे त्याच्या नावामागे त्याच्या आईचं नाव लावण्यामागचं कारण सांगितलं आहे. यावेळी तो म्हणाला, “मला माझ्या आईनं लहानाचं मोठं केलं आहे. तिनं मला वाढवलंय. आज मी जे काही मिळवलंय ते सगळं तिच्यामुळे. त्यामुळे मला असं वाटतं की, आज जे काही माझं थोडं फार नाव आहे, त्यात तिलाही श्रेय मिळायला हवं. कारण- मी पाहिलंय की, तिनं मला एकटीनं वाढवताना किती मेहनत केली आहे.”
राजनं पुढे ऑडिशनच्या आठवणी आणि सुरुवातीच्या काळाबद्दल सांगितलं आहे. तो म्हणाला, “मी ऑडिशन देताना खूप लाइन्स वगैरे विसरायचो, भीती वाटायची.” राज पुढे त्याला मिळालेल्या पहिल्या ब्रेकबद्दल म्हणाला, “मराठीतला सांगायचं झालं तर ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत मिळालेला रोल. त्यातही गंमत अशी की, त्यांनी मला फोटो काढून पाठवायला सांगितलेला आणि मला कळेच ना की, कसा फोटो काढून पाठवू; पण पाठवला फोटो. मग ‘तू तेव्हा तशी’ हा मला पहिला ब्रेक मिळाला आणि ज्यात माझा लूक खूप वेगळा आहे, मला लोक ओळखणारही नाहीत.”
पुढे त्याला कधी सेटवर ज्येष्ठ कलाकारांकडून ओरडा पडला का, असं विचारल्यानंतर राज म्हणाला, ” ‘नवरी मिळे हिटलरला’च्या सेटवर मला दिग्दर्शक ओरडले होते. मी एक सीन करीत होतो,,. मला रडायचं होतं, मी तो सीन केला त्यात तेव्हा एक खूप मोठे अभिनेते आहेत. पण ते मला म्हणाले की, मजा नाही आली. माझं असं झालं की, मी इतकी मेहनत करूनही मजा नाही आली म्हटल्यावर मला वाईट वाटलं; पण एका दुसऱ्या सहअभिनेत्रीनं मला समजावलं की, मी छान केलं आहे.”
खूप नकार मिळाले – राज मोरे
राजला पुढे मेहनत की लक काय महत्त्वाचं ठरतं, असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “लक आहे. नशीब महत्त्वाचं असतंच. अक्षय कुमारसुद्धा म्हणालेला की, त्याच्यापेक्षा भारी लोक त्याला दिसतात. पण, तो आज अक्षय कुमार आहे. कारण- त्याच्या नशिबात होतं. त्यामुळे नशीब महत्त्वाचं आहे; पण मी घरी बसून माझ्याकडे मालिका येईल, असं नाही होणार. मला त्यासाठी ऑडिशन द्यायला लागलं. खूपदा नकार मिळाले, खूप लोकांनी दुर्लक्ष केलं; पण मेहनत करीत करीत पुढे जातो ना तेव्हा आपल्याला त्याचं खूप छान फळ मिळतं.”
