‘रसोडे मे कौन था’ हे रॅप साँग हे सध्या कायमच चर्चेत असतात. छोट्या पडद्यावरील ‘साथ निभाना साथियाँ’ या मालिकेतील कोकिलाबेन आणि तिची सून गोपी बहु यांच्यातील संवादांवरून हे मजेशीर रॅप साँग तयार करण्यात आले आहे. यशराज मुखाटे या तरुणाने हा रॅप साँग तयार केला असून त्यामुळे तो रातोरात प्रकाशझोतात आला आहे. यशराज मुखाटे हा एक प्रसिद्ध संगीतकार आहे. ‘रसोडे मे कौन था’ या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर त्याच्या फॉलोअर्सची संख्या तुफान वाढली. नुकतंच यशराज मुखाटेने त्याची आवडती अभिनेत्री कोण याबद्दल खुलासा केला आहे.
पारंपारिक संगीताला रंजक अंदाजात बदलणारा कलाकार म्हणून यशराज मुखाटेला ओळखले जाते. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यशराज मुखाटे हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. हिंदी, मराठी मालिका, चित्रपट, बॉलिवूड, टॉलिवूड अशा सर्वच सिनेसृष्टीत त्याचे लक्ष असतं. ‘रसोडे में कोन था’, ‘पावरी हो रही’ यासारखी अनेक हिट गाणी यशराजने केली आहेत. नुकतंच त्याने सोशल मीडियावर चाहत्यांशी गप्पा मारल्या. यावेळी त्याला चाहत्यांनी त्याच्या करिअरबरोबरच खासगी आयुष्यातील प्रश्न विचारले. त्याची यशराजने हटके उत्तर दिली.
आणखी वाचा : “देव यांना सदबुद्धी देवो…” स्वत:बद्दल चुकीची बातमी वाचताच कुशल बद्रिके संतापला
यशराजला सोशल मीडियावर चाहत्यांशी गप्पा मारताना त्याला ‘तुझी आवडती अभिनेत्री कोण? आणि अभिनेता कोण? असे प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याने प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव घेतलं. त्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे.

यशराज मुखाटेने त्याचा आवडता अभिनेता कोण या प्रश्नावर उत्तर देताना त्याने प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे आणि गिरीश कुलकर्णी यांची नावं घेतली. तर आवडती अभिनेत्री म्हणून वैदेही परशुरामीचे नाव घेतले आहे. त्याबरोबर त्याने हार्ट इमोजीही शेअर केला होता. यानंतर तिनेही याबद्दल इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती.
सध्या तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. दरम्यान यानंतर ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र अद्याप त्या दोघांनीही याबद्दल काहीही भाष्य केलेले नाही.