Zee Marathi Promo : सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर राहण्यासाठी मोठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या आठवड्यात ‘झी मराठी’च्या आठ मालिकांमध्ये नवनवीन रहस्यांचा खुलासा होणार आहे. याचा प्रोमो वाहिनीने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आता कोणत्या मालिकांमध्ये प्रेक्षकांना येत्या आठवड्यात काय पाहायला मिळेल जाणून घेऊयात…

सावळ्याची जणू सावली

सारंगला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात येणार आहे. पण, या कठीण प्रसंगात सावली त्याला खंबीरपणे साथ देईल. “या सगळ्यातून मी तुम्हाला निर्दोष सोडवेन” असा विश्वास सावली सारंगला देते.

पारू

आदित्य पारूशी लग्न करून तिला किर्लोस्करांची सून म्हणून घरात आणतो. पारू सुद्धा संपूर्ण मेकओव्हर करून अहिल्यादेवीला सामोरी जाणार आहे. आदित्यवरच्या प्रेमाखातर पारूने हा निर्णय घेतलेला आहे.

वीण दोघांतली ही तुटेना

समर सगळ्या कुटुंबीयांसमोर सांगतो, “मी माझ्या बहिणीच्या सुखासाठी काहीही करू शकतो, स्वानंदीशी लग्नही करू शकतो.” यानंतर स्वानंदी प्रचंड संतापते आणि म्हणते, “एक स्त्री तिच्या आनंदासाठी स्वत:च्या मर्जीने जगूच शकत नाही का? जर असं असेल तर मला लग्न करायचं नाहीये” आता समर-स्वानंदीच्या आयुष्यात पुढे कोणता ट्विस्ट येणार, या दोघांचं लग्न कसं होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लक्ष्मी निवास

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत ३ मोठे ट्विस्ट येणार आहेत. भावना-सिद्धूच्या प्रेमाची नव्याने सुरुवात होणार असते पण, याचदरम्यान दोघांना एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. सिद्धूला अटक करण्यासाठी गाडेपाटलांच्या घरात पोलीस येतात. श्रीकांतच्या ( आनंदीचे वडील) अपघाती मृत्यूप्रकरणी त्याला अटक करण्यात येते. पण, प्रत्यक्षात हा अपघात श्रीकांतच्या बहिणीच्या नवऱ्याने म्हणजेच रवीने घडवून आणलेला असतो. आता भावना या सगळ्याचा कसा सामना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

तर, दुसरीकडे जयंतचं कधीही न पाहिलेलं भयंकर रूप जान्हवीसमोर येणार आहे. कारण, जयंत सगळ्या मर्यादा ओलांडून जान्हवीच्या आजीचा खून करण्याचा प्रयत्न करणार आहे. जयंत रागात जानूच्या आजीच्या तोंडावर उशी दाबतो, इतक्यात जान्हवी तिथे पोहोचते. जयंतचं विकृत रूप पाहून आणि तो आपल्या आजीला जीवे मारण्याचा प्रयत्न करतोय हे पाहिल्यावर जान्हवीच्या पायाखालची जमीन सरकणार आहे.

‘लक्ष्मी निवास’मध्ये येणारा तिसरा ट्विस्ट म्हणजे, लक्ष्मी आणि श्रीनिवास एकमेकांपासून मुलांमुळे दुरावणार आहेत. श्रीनिवास संतोष बरोबर राहणार आहे तर, लक्ष्मीला हरीशबरोबर जावं लागतं. यामुळे दोघांची ताटातूट होणार आहे.

कमळी

कबड्डी सामन्याची तयारी करणाऱ्या कमळीला अनिका म्हणते, मुंबईत टिकणं तुझ्यासारख्या गावछाप मुलीचं काम नाहीये. यानंतर कमळी अनिकाला चांगलाच धडा शिकवणार आहे. मी शिवरायांची वाघीण आहे त्यामुळे मुंबईत टिकणार आणि तुला जिंकून दाखवणार… ते पण तुझ्या नाकावर टिच्चून असं कमळी स्पष्टपणे अनिकाला सांगते.

तारिणी

तारिणी आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी थेट कौशिकी खांडेकरच्या घरात शिरणार आहे. यात तिला केदार साथ देणार आहे. “तुझ्या या प्रवासात मी कायम बरोबर असेन” असा विश्वास केदार तारिणीला देतो.

तुला जपणार आहे

“मला एकदा तरी अंबिकाला भेटायचंय” अशी इच्छा अथर्व मीरासमोर व्यक्त करतो. त्याची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

देवमाणूस

माधुरीच्या खूनात अजितकुमार अडकणार आहे. खरंतर, माधुरीला मारण्यात अजितकुमारचा काहीच हात नसतो, त्यामुळे आपण इथे पोहोचण्याआधी माधुरीला कोणी मारलं असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतो. यानंतर त्याला अप्पा आणि लालीवर संशय येतो. आता माधुरीला नेमकं कोणी मारलं याचा शोध घेण्याआधीच अजितकुमारला अटक होईल का? याचं उत्तर सर्वांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.

‘झी मराठी’च्या या आठ मालिकांमध्ये येत्या काही दिवसांत एकापेक्षा एक भयंकर ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. हा ‘मनोरंजनाचा दशावतार’ सायंकाळी ६:३० ते रात्री ११ वाजेपर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. “हे खरंच भयंकर आहे”, “लक्ष्मी-निवासमध्ये अपेक्षित ट्विस्ट आला…आता भावना सिद्धूचं काय होणार हे पाहताना मजा येईल”, “फक्त कमळीचा प्रोमो पॉझिटिव्ह आहे बाकी सगळ्यात भयंकर ट्विस्ट आहेत”, “बापरे लक्ष्मी निवास प्रोमो डेंजर आहे”, “देवमाणूस-लक्ष्मी निवास जयंत प्लॉट…मजा येणार”, “खतरनाक एपिसोड” अशा कमेंट्स या प्रोमोवर प्रेक्षकांनी केल्या आहेत.