Devmanus and Tarini Upcoming Twist: ‘ टीव्हीवर प्रदर्शित होणार्‍या मालिका प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात. मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट, आपल्या आवडत्या पात्रांच्या आयुष्यात चाललेली उलथापालथ अशा अनेक गोष्टी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.

या मालिका बहुतांश वेळी सोमवार ते शनिवार प्रदर्शित होतात. मात्र, जेव्हा महासंगम किंवा महाएपिसोड असेल, तेव्हा काही वेळा वाहिन्या रविवारीदेखील मालिकांचे भाग प्रदर्शित करतात.

आता देवमाणूस व तारिणी या दोन्ही मालिका रविवारी प्रदर्शित होणार आहेत. १९ ऑक्टोबर रोजी या दोन्ही मालिका पाहता येणार आहेत. दुपारी १ वाजता देवमाणूस ही मालिका प्रदर्शित होणार आहे; तर, तारिणी ही मालिका दुपारी २ वाजता प्रदर्शित होणार आहे. रहस्य उलगडणारा हा महारविवार असल्याचे झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये म्हटले आहे.

‘देवमाणूस’ व ‘तारिणी’ मालिकांमध्ये येणार ट्विस्ट

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. त्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, तारिणीला युवराजविरोधात मोठा पुरावा सापडणार आहे. युवराज एका मुलीला घेऊन एका हॉटेलमध्ये गेलेला दिसतो. तारिणीची टीम ते सीसीटीव्ही फुटेजचे रेकॉर्ड असलेले पेन ड्राइव्ह घेते. दुसरीकडे केदार ज्या व्यक्तीला अनेक दिवसांपासून शोधत होता, ती व्यक्ती त्याला त्याच्यासमोर दिसते. हातात अंगठी असलेला व्यक्ती तारिणीच्या घरात पाहायला मिळते. ते पाहून त्याला धक्का बसतो.

प्रोमोमध्ये पुढे देवमाणूस या मालिकेतदेखील मोठा ट्विस्ट येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच माधुरीचा खून झाला आहे. तिचा मृतदेह गोपालने त्याच्या घराजवळ लपवला आहे. जामकर तिथे येतो. त्याला पाहिल्यानंतर गोपाळला भीती वाटते. तो मनातल्या मनात म्हणतो, “याने जर चारा बाजूला केला, तर त्याला माधुरीची डेड बॉडी दिसेल.”. पुढे जामकर विचारतो की, हा चारा इथे असा मधेच का ठेवला आहे?

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘अनेक रहस्ये उलगडणारा हा रविवार महारविवार ठरणार’, अशी कॅप्शन दिली आहे.

तारिणी मालिकेत दाखविल्याप्रमाणे, युवराज व तारिणीची बहीण निशी यांचे लग्न ठरले आहे. मात्र, युवराज चांगला मुलगा नसल्याचे तिला माहीत आहे. तिने हे तिच्या घरच्यांना सांगण्याचा प्रयत्नदेखील केला; पण तिचे कोणीही ऐकले नाही. आता ती युवराजविरुद्ध सर्वांना पुरावा दाखवू शकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

देवमाणूस मालिकेत काही दिवसांपूर्वीच माधुरीचा खून झाला आहे. हा खून कोणी केला आहे हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. मात्र, मृतदेह गोपाळने लपवून ठेवला आहे. आता जामकरला गोपाळबद्दल समजणार का, मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.