Devmanus Upcoming Twist:’देवमाणूस’ या मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे. गावाकडेची पार्श्वभूमी, नरुआजीच्या अफलातून म्हणी, गोपाळचे देवमाणूस बनून राक्षस प्रवृत्ती, अण्णांचा दबदबा, गोपाळबरोबर सुखाने संसार करण्याची स्वप्ने पाहणारी लाली, गुन्हेगारांना धडा शिकवणारे इन्स्पेक्टर मार्तंड जामकर ही आणि मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात.

देवमाणूस या मालिकेत दाखविल्याप्रमाणे, गोपाळ बनून अण्णांच्या घरात राहणारा, त्यांचा मुलगा असल्याचे सांगणारा खरा गोपाळ नाही. तो देवीसिंग ऊर्फ डॉक्टर अजितकुमार आहे. त्याने लहानपणीच घरातून पळून गेलेल्या आणि घरापासून अनेक वर्षे दूर असलेल्या गोपाळला जीवे मारले आणि त्याच्या कुटुंबात येऊन तोच गोपाळ असल्याचे सांगितले. त्यावर आजी आणि त्याचा पोलीस भाऊ यांना विश्वास बसला नाही. पण, देवीसिंगने इतर सर्वांना तोच त्यांचा गोपाळ असल्याचे पटवून दिले.

गोपाळ सर्वांच्या नजरेत चांगली व्यक्ती आहे. जो इतरांच्या अडचणीत, संकाटाच्या काळात त्यांना मदत करतो. त्यामुळे तो कुटुंबीय आणि घरच्यांच्या नजरेत देवमाणूस आहे. पण, खरे तर देवमाणसाच्या चेहऱ्याआड तो लोकांची विशेषत: महिलांची फसवणूक करतो. ज्या महिला काही त्रास सहन करत असतील, त्यांना तो मदत करण्याच्या निमित्ताने त्यांच्या जवळ जातो. त्यांचा विश्वास जिंकतो आणि पुन्हा त्यांच्याकडून त्यांचे पैसे वसूल करतो आणि त्यांना जीवे मारतो.

“आपली सगळी तयारी…”

आता देवमाणूस मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. माधुरीचे गोपाळवर प्रेम आहे. तिला त्याच्याशी लग्न करायचे आहे. तसेच, तिच्याकडे दागिने आहेत. म्हणून गोपाळने पत्नी लालीबाबत खोट्या गोष्टी सांगून आपण लग्न करून इथून निघून जाऊ, असे सांगितले आहे. त्यामुळे माधुरीदेखील तिच्याकडील सर्व दागदागिने घेऊन पळून जाण्यास तयार झाली. दुसरीकडे माधुरीचे दुसऱ्या एका मुलाबरोबर लग्न ठरले आहे. आता यादरम्यानच गोपाळला मोठा धक्का बसणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर देवमाणूस मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, माधुरीच्या हळदीचा कार्यक्रम सुरू आहे. गोपाळ येतो. आल्यानंतर त्याचे मित्र आनंदाने ओरडत गोपाळ आला, असे म्हणतात. त्याची आई माधुरीला हळद लाव, असे सांगते. गोपाळ माधुरीला हळद लावतो.

माधुरी मनातल्या मनात म्हणते की, इथे तुझ्या काळजीने माझा जीव गेला असता. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, माधुरी आणि गोपाळ दोघेच एका खोलीत आहेत. गोपाळला माधुरी विचारते की, आपली सगळी तयारी झाली आहे का? त्यावर गोपाळ म्हणतो होय. आपली सगळी तयारी झाली आहे. तू फक्त मला देवळात येऊन भेट. फक्त इथून बाहेर पडताना पैसे आणि दागिने घेऊन बाहेर पड.

प्रोमोमध्ये पुढे दिसते की, गोपाळ घराबाहेर पडत असताना त्याचा पाय घसरतो आणि तो पायऱ्यांवरून खाली पडतो. तिथे त्याला रक्त दिसते. तो समोर पाहतो, तर माधुरीचा खून झालेला दिसतो. तो तिच्याकडे डोळे विस्फारून पाहत राहतो. त्याच्याकडे अण्णा भिंतीपलीकडून पाहतात.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, माधुरीच्या रक्ताने नक्की कोणाचे रंगलेत हात?, अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकरी काय म्हणाले?

आता या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. “वा! अण्णा नाईक. तुम्ही तर खरंच देवमाणसाचे बापमाणूस निघालात”, “अण्णा नाईकने खून केला”, नाईकबाबांनी काम उरकलं”, “खूप भयंकर आणि यामध्ये लालीसुद्धा सामील आहे”, “अनपेक्षित”, “काय ट्विस्ट आहे, अनपेक्षित”, “जसा बाप, तसा मुलगा. तू त्यांचा मुलगा आहेस, असं वाटत आहे”, “हा ट्विस्ट अपेक्षित नव्हता. पैसे, दागिने गेले आणि माधुरीचासुद्धा खून झाला. आता गोपाळ काय करणार”, “हिम्मतरावसुद्धा रा री रे रा”, अशा अनेक भन्नाट कमेंट्स पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आता मालिकेत नेमकं काय होणार, काय घडणार, माधुरीचा खून नक्की कोणी केला हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.