Zee Marathi : ‘झी मराठी’च्या ‘कमळी’ या नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. या मालिकेत सर्वांना विजया बाबर आणि निखिल दामले यांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. याशिवाय अनेक दमदार कलाकार या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
या मालिकेतील ‘कमळी’ ही गावाकडची पण, खूप हुशार मुलगी असते. तिची आई तिला महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात जाण्यास परवानगी देत नसते. मुंबईच्या कॉलेजचं नाव सुद्धा काढायचं नाहीस असं कमळीची आई तिला बजावून सांगते. यामागे एक महत्त्वाचं कारण असतं. ‘कमळी’ ही राजघराण्यातील हरवलेली मुलगी असते… तिचा शोध १८ वर्षांपासून सुरू असतो. आता कमळी तिच्या स्वप्नांचा प्रवास कसा पूर्ण करेल? तिच्या आजीची आणि तिची भेट केव्हा होईल? याचं कथानक प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल. ही मालिका ‘झी तेलुगू’वरील लोकप्रिय सीरियल ‘मुत्याला मुग्गू’चा रिमेक असल्याच्या चर्चा आहेत.
येत्या ३० जूनपासून ही ‘कमळी’ सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज होणार आहे. या मालिकेच्या प्रसारणाची वेळ रात्री ९ वाजताची ठरली आहे. सध्या या वेळेला ‘शिवा’ ही मालिका प्रसारित केली जाते. त्यामुळेच, नव्या मालिकेसाठी ‘शिवा’च्या वेळेत बदल केला जाण्याची शक्यता आहे. ३० जूनपासून ‘शिवा’ मालिका रात्री नऊऐवजी ९.३० वाजता प्रसारित केली जाऊ शकते.
सध्याच्या घडीला ‘शिवा’ मालिका ९ ते १० या एक तासाच्या वेळेत प्रसारित केली जात आहे. नव्या मालिकेला साडेनऊचा स्लॉट मिळेल असा अंदाज अनेकांचा होता पण, ‘झी मराठी’वर नव्याने सुरू होणाऱ्या ‘कमळी’ मालिकेला ९ वाजताचा प्राइम स्लॉट देण्यात आला आहे. त्यामुळेच येत्या ३० जूनपासून ‘शिवा’ मालिकेची वेळ बदलली जाईल अशा चर्चा आहेत. लवकरच वाहिनी याबद्दल अधिकृत माहिती देईल.

दरम्यान, ‘कमळी’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये विजया बाबर आणि निखिल दामले यांच्यासह केतकी कुलकर्णी, योगिनी चौक, इला भाटे, अनिकेत केळकर असे दमदार कलाकार एकत्र झळकणार आहेत.