Zee Marathi Navri Mile Hitlerla Serial Off Air : छोट्या पडद्यावरच्या मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीवर अवलंबून असते. येत्या काही महिन्यांत ‘झी मराठी’ वाहिनीवर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामुळे काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.

‘झी मराठी’ वाहिनीवर गेल्यावर्षी १८ मार्च २०२४ रोजी ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका सुरू झाली. या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज ही फ्रेश जोडी छोट्या पडद्यावर पाहायला मिळाली. या मालिकेला पहिल्या दिवसांपासून प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. याशिवाय २०२४ च्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्याला या मालिकेने अनेक अवॉर्ड्स देखील जिंकले. मात्र, आता लवकरच ही मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका ऑफ एअर होणार असल्याच्या चर्चा आहेत. यापूर्वी मालिकेत लक्ष्मीची भूमिका साकारणाऱ्या सानिका काशीकरने या वृत्ताला इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत दुजोरा दिला होता. आता याच मालिकेतील आणखी एक अभिनेत्री ती म्हणजे भूमिजा पाटील. तिचं स्वत:चं युट्यूब चॅनेल आहे. “सेटवरचे अखेरचे काही दिवस…” असं थंबनेल देत भूमिजाने हा व्हिडीओ तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. यावरून ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका लवकरच ऑफ एअर होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

भूमिजाच्या व्हिडीओमध्ये सेटवरच्या गप्पागोष्टी, धमाल आणि शेवटी एका चाहतीने ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील सर्व कलाकारांची भेट घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या चाहतीने सर्व कलाकारांना सुंदर अशी कविता लिहून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ती म्हणते, “बरोबर वर्षाभराआधी एका नव्या मालिकेचे काही क्युट प्रोमो आम्ही पाहिले. ते प्रोमो पाहून मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती. मालिकेचं वेगळं नाव आणि याची आगळीवेगळी प्रेमकथा सर्वांसाठी लक्षवेधी ठरली. मुख्य हिरो-हिरोईनची केमिस्ट्री एकदम जबरदस्त होती. एक रागीट हिरो आणि चंचल, सतत उत्सुकता असणारी हिरोईन…या दोघांच्या प्रेमाचा प्रवास एकदम क्रेझी होता. या मालिकेच्या संपूर्ण टीमला खूप-खूप शुभेच्छा…कारण, ही फक्त सुरुवात आहे अजून खूप प्रवास बाकी आहे. Lots Of Love.”

दरम्यान, भूमिजाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर “प्लीज ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका बंद करू नका”, “प्लीज या मालिकेची वेळ बदला म्हणजे टीआरपी वाढेल पण बंद करू नका”, “लीला तुझी आणि एजे जोडी ‌खूप छान…आम्ही कधीच विसरू शकणार नाही” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.