Zee Marathi New Serial Vin Doghantali Hi Tutena : गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेरीस आला आहे. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधानचं छोट्या पडद्यावर कमबॅक झालेलं आहे. तेजश्री प्रधान ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्यासह या मालिकेत लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे प्रमुख भूमिका साकारणार आहे.

तेजश्री आणि सुबोध यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत. या दोघांनी सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी ‘तुला पाहते रे’ आणि ‘होणार सून ती ह्या घरची’ या आशयाच्या पोस्ट शेअर केल्या होत्या. यावरूनच चाहत्यांना दोघंही ‘झी मराठी’च्या मालिकेत झळकणार असल्याची हिंट मिळाली होती.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत प्रेक्षकांना समर ( सुबोध भावे ) आणि स्वानंदीची ( तेजश्री प्रधान ) अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. हे दोघंही एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये भेटतात. लग्न कुठे होईल, कसं होईल याची चर्चा करण्यासाठी यांची नियोजित भेट होते. पण, समरने आधीच सगळं काही ठरवलेलं असतं. त्यामुळे स्वानंदी तिथून निघून जाणं पसंत करते.

इतक्यात समरच्या लक्षात येतं की, त्यांनी एकमेकांच्या लग्नाबद्दल काहीच ठरवलेलं नाहीये. यावर स्वानंदी म्हणते, “त्यात काय बोलायचं आहे ते तर ठरलेलं आहेच” स्वानंदी तिच्या भावाच्या सुखासाठी समरशी लग्न करण्याचा निर्णय घेते. तर, समर बहिणीसाठी स्वानंदीशी लग्न करणार असतो.

“नियतीने जोडी जुळवली की ठरवून ‘लग्न’ होतं… आणि न ठरवता ‘प्रेम’…” असं कॅप्शन देत ‘झी मराठी’ने हा प्रोमो प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे. तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या नव्या मालिकेचं नाव ‘वीण दोघांतली ही तुटेना’ असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मालिकेचं नाव ‘झी मराठी’ची जुनी मालिका ‘खुलता कळी खुलेना’च्या शीर्षक गीतावरून ठेवण्यात आलं आहे. “हीच प्रीती, हीच भीती…वीण दोघांतली ही तुटेना” या ओळी ‘खुलता कळी खुलेना’च्या शीर्षक गीतात होत्या. त्यामुळे नव्या मालिकेचं नाव ऐकताच क्षणी नेटकऱ्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नव्या मालिकेची वेळ आणि प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येतील. तेजश्री आणि सुबोधच्या या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सर्वांवर भारी पडेल असा अंदाज बांधला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तेजश्रीच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “अतिशय सुंदर प्रोमो”, “तेजश्री नेहमीप्रमाणे उत्तमच”, “तेजश्रीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहून आनंद झाला”, “म्हणजे ते जुने दिवस नव्याने येणार…अप्रतिम” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.