Paaru & Savalyachi Janu Savali Serial Promo : प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नेहमीच नवनवीन ट्विस्ट आणले जातात. दोन मालिकांचा ‘महासंगम’ ही नवीन संकल्पना गेल्या काही दिवसांत मराठी वाहिन्यांवर सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर सध्या दोन लोकप्रिय मालिकांचा महासंगम सुरू आहे. यामध्ये प्रेक्षकांना नेमका कोणता नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार याबद्दल जाणून घेऊयात…

‘पारू’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या दोन्ही मालिकांचं शूटिंग सध्या महासंगम निमित्त एकत्र सुरू आहे. यादरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडणार आहेत. मैत्रीच्या नव्या रंगांनी सजलेला हा ट्रॅक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार आहे. या महासंगमात काही जुनी रहस्य उघड होणार आहेत. शिवानीने आखलेल्या धोकादायक प्लॅनमुळे सारंगच्या कुटुंबाला येत्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

तिलोत्तमा आणि चंद्रकांत यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी किर्लोस्कर कुटुंब तसेच आदित्य-पारू यांना आमंत्रण दिलं जातं. हा क्षण आनंदाचा असला तरी प्रत्येकाच्या मनात शंका आणि तणाव निर्माण झालेला असतो. पार्टी दरम्यान, अहिल्या आणि पारू समोरासमोर येतात. जुन्या गोष्टी आणि भावनिक संघर्ष पुन्हा उफाळून येतात. त्याचवेळी, एक जुनी मर्डर केस पुन्हा एकदा सर्वांसमोर येणार आहे. त्यात सारंग व आदित्य अडकणार आहेत. विशेषत: यात सारंग कोर्टाच्या खटल्यात अडकणार आहेत.

कोर्टात अहिल्या विरुद्ध पारू-आदित्य असा संघर्ष उभा राहणार आहे. दुसरीकडे, शिवानी आणि सावली-सारंग यांच्यातील संघर्षही वाढला आहे. सावली आणि पारू एकत्र येऊन या कठीण प्रसंगाला सामोरं जाणार आहेत. केस अधिक गुंतागुंतीची होत असताना वकील म्हणून कालिंदीची दमदार एन्ट्री होणार आहे.

कालिंदीच्या हुशारीमुळे सारंगची केस एका रोमांचक वळणावर येणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सारंग-सावलीचा मेहंदळेंच्या घरात आनंदाने गृहप्रवेश होणार आहे.