Zee Marathi Awards 2025 : ‘झी मराठी’च्या पुरस्कार सोहळ्याला यंदा अनेक लोकप्रिय कलाकारांच्या कुटुंबीयांनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं. ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्री प्राप्ती रेडकरची आजी, ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडची आई यांच्या सरप्राइज एन्ट्रीचे सुंदर प्रोमो वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या कलाकारांसह ‘पारू’ फेम अभिनेता प्रसाद जवादेला भेटण्यासाठी सुद्धा त्याच्या आयुष्यातील खास व्यक्ती यावेळी आली होती.

लाडक्या लेकाचं भरभरून कौतुक करण्यासाठी खास अभिनेत्याची आई या सोहळ्याला उपस्थित राहिली होती. प्रसाद जवादे मालिकेत आदित्य या आदर्श मुलाची भूमिका साकारताना दिसतो. खऱ्या आयुष्यात सुद्धा प्रसादचं आपल्या आईबरोबर खूपच खास नातं आहे. त्याच्या आईला गेल्यावर्षी कर्करोगाचं निदान झालं होतं. मात्र, या कठीण प्रसंगात सुद्धा प्रसादने न खचता अगदी श्रावणाबाळासारखी काळजी घेतल्याचं त्याच्या आईने सर्वांना सांगितलं.

प्रसाद जवादेची पत्नी अभिनेत्री अमृता देशमुख याबद्दल म्हणते, “मागच्या वर्षी दिवाळीमध्ये काकूंना कॅन्सरचं निदान झालं. खरंतर, प्रसादला रोज मालिकेत काम करताना पाहायचं हे काकूंचं स्वप्न होतं. त्यामुळे एकीकडे पारू मालिकेचं शूट सुरू होतं त्याचवेळी दुसरीकडे आम्ही काकूंचे उपचार सुद्धा सुरू केले. प्रसादच्या स्वभावातील सगळे पैलू मी आजवर पाहिलेत. पण, या आजारपणात जेव्हा मी प्रसादला काकूंची एका वडिलांप्रमाणे काळजी घेताना पाहिलं…तेव्हा त्याची एक वेगळी बाजू मला दिसली.”

अभिनेत्याची आई पुढे म्हणाली, “रुग्णालयात सगळेजण त्याला श्रावणबाळ म्हणतात आणि खरोखरच तो आमच्यासाठी श्रावणबाळासारखा आहे. हा माझा आधुनिक काळातला श्रावणबाळ आहे. त्याला आज जे पारितोषिक मिळालंय ते तंतोतंत खरं आहे.” प्रसादला यावेळी अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

अमृता व प्रसादच्या आईने सांगितलेले प्रसंग ऐकून हर्षदा खानविलकर यांचे डोळे सुद्धा पाणावले होते. अभिजीत खांडकेकर, नम्रता संभेराव, शंतनू गंगणे या कलाकारांनी या प्रोमोवर कमेंट्स करत प्रसादचं कौतुक केलं आहे. याशिवाय हा प्रोमो पाहताच काही नेटकऱ्यांनी प्रसादला यंदा सर्वोत्कृष्ट मुलगा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय असा अंदाज वर्तवला आहे.