Tula Japnar Aahe fame Mahima Mhatre: प्रत्येक सण-उत्सवाच्या प्रत्येकाच्या मनात काही आठवणी असतात. काही चांगल्या आठवणी आयुष्यभर लक्षात राहतात. याबरोबरच प्रत्येक सणाला काय वेगळं करायचं याची गणितं प्रत्येकाच्या मनात असतात. आता अभिनेत्री महिमा म्हात्रेने ती दिवाळी कशी साजरी करते, याबद्दल वक्तव्य केले आहे.

“आम्ही भाऊबीजेच्या दिवशी कुठेही…”

मराठी सीरिअल्स ऑफिशिअल्सबरोबर साधलेल्या संवादात ‘तुला जपणार आहे’ फेम अभिनेत्री महिमा म्हात्रे म्हणाली, “आम्ही दिवाळी खूप पारंपरिक पद्धतीने साजरी करतो. नरक चतुर्दशीला लवकर उठून उटणं लावणं, दिवे लावणं, कुटुंबासोबत फराळ करणं, देवदर्शन आणि नातेवाईकांना भेटणं हे सगळं एकत्रित करत दिवाळीची मजा वाढते.”

“या वर्षी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, कारण ‘तुला जपणार आहे’ च्या शूटिंगमुळे कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ मिळत नाही. पण, दिवाळीच्या दिवशी मी घरीच असणार आहे. दरवर्षी आम्हा भावंडांची एक परंपरा आहे की आम्ही भाऊबीजेच्या दिवशी कुठेही असलो तरी एकत्र येतो.”

“माझा भाऊ ध्रुव माझ्या खूप जवळचा आहे. ध्रुव आणि माझी तन्वी ताई दोघांनीही मला खूप साथ दिली आहे. मार्गदर्शन, कौतुक केलं आहे आणि मला माझ्या क्षेत्रात पुढे जाण्यास मदत केली”, असे म्हणत महिमाने भावंडांबरोबर असलेल्या बॉण्डिंगबाबत वक्तव्य केले आहे.

महिमा सध्या तुला जपणार आहे या मालिकेत काम करत आहे. ती या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. महिमाने मीरा ही भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. वेदाची आई होऊन ती तिचे कर्तव्य पार पाडत आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, मीराची मोठी बहीण राधा लहानपणीच हरवली होती, त्यामुळे मीरा गेली कित्येक वर्षे तिच्या शोधात होती. मात्र, काही काळापूर्वीच मीराला अंबिकाच तिची राधा ताई असल्याचे समजले आहे. या सगळ्यात मायाने कट कारस्थान करून माया हीच तिची राधा ताई असल्याचे सांगितले आहे. मात्र, मायाच्या खोटारडेपणाबद्दल मीराला समजले आहे. आता मायाचे सत्य ती सर्वांना कधी व कसे सांगणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.