Veen Doghatli Hi Tutena Upcoming Twist: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येत आहेत. अधिरा व रोहनच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच रोहनने एक अट ठेवली. ती अट म्हणजे त्याच्या नंदूताईचे म्हणजेच स्वानंदीचे लग्न झाल्याशिवाय तो लग्न करणार नाही. रोहनची ही अट ऐकून सर्वांनीच स्वानंदीच्या लग्नासाठी मुलं बघायला सुरुवात केली. स्वानंदी व प्रतीकचे लग्न ठरले.
प्रतीक व स्वानंदी आणि रोहन व अधिरा यांचा साखरपुडा एकाच ठिकाणी आयोजित केला गेला. पण, साखरपुड्यात मल्लिकाने विघ्न आणले. तिने प्रतीकच्या आईला स्वानंदीचे वय खोटे सांगितले असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रतीकच्या आईने तो साखरपुडा मोडला. स्वानंदीच्या वडिलांनी साखरपुडा मोडू नये म्हणून अनेक प्रयत्न केले. गयावया केली, ते त्यांच्या पाया पडले; मात्र प्रतीक व त्याचे कुटुंब थांबले नाही.
स्वानंदीचा साखरपुडा मोडल्यानंतर तिच्या भावाने रोहननेदेखील मी साखरपुडा करणार नाही, असे सांगितले. त्यामुळे अधिरा अस्वस्थ झाली. तिने स्वत:ला इजा करून घेतली. त्यानंतर समर व स्वानंदी यांनी त्यांच्या भावंडांच्या सुखासाठी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
विचारांमध्ये तफावत असलेल्या या दोन व्यक्ती फक्त त्यांच्या भावंडांसाठी एकमेकांना स्वीकारण्यास तयार झाल्या. आता एकमेकांच्या विरुद्ध स्वभाव, विचार असणाऱ्या स्वानंदी व समर यांचे लवकरच लग्न होणार आहे. झी मराठी वाहिनीने नुकताच मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे.
स्वानंदी व समर लग्नबंधनात अडकणार
प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, समर व स्वानंदी लग्नानंतर त्यांच्या खोलीत आले आहेत. ते दोघेही मनातल्या मनात विचार करrत आहेत. स्वानंदी म्हणते, “लग्न झालं. मंत्रोच्चार झाले”, समर म्हणतो, “देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने सप्तपदी झाल्या”, स्वानंदी म्हणते, “सगळं सगळ्यांच्या मनासारखं झालं”, समर म्हणतो, “आता संसारही होईल”, स्वानंदी म्हणते, “ठरवून लग्न होतं”, समर म्हणतो, “पण प्रेम? होईल का?”, स्वानंदी म्हणते, “ठरवून प्रेम होईल का?” यादरम्यान, समर व स्वानंदी यांच्या लग्नाचे काही सीन पाहायला मिळतात. समर व स्वानंदी आणि रोहन व अधिरा यांचे लग्न होताना पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘स्वानंदी आणि समरची सात जन्मांची गाठ बांधली जाणार. लग्न होणार; पण प्रेम?’, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
आता प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंटस केल्या आहेत. “खूप सुंदर प्रोमो आहे. लग्नानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडतील. तो प्रवास पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे”, “खूपचं सुंदर! समर स्वानंदी यांच्या लग्नसोहळ्यातील क्षण पाहण्याची आतुरता आहे आणि प्रेमाचे काय ते तर लग्नानंतर हळूहळू फुलेलच.”





“प्लीज आता त्या काकूने लग्नानंतर स्वानंदीला कसा त्रास दिला हे दाखवण्यापेक्षा त्या नवरा-बायकोने अनोळखी नातं कस फुलवलं हे दाखवा. सध्या अशा विषयांची समाजाला जास्त गरज आहे”, “चला अखेर, ज्या क्षणांची सगळे आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आला”, “अभिनंदन. याचीच वाट पाहत होतो. काकूच्या सर्व कारस्थानाला पुरून उरला आणि शेवटी लग्नाच्या गाठीत बांधले गेलात”, “खूप सुंदर प्रोमो”, “एकमेकांचे विचार जुळले की प्रेम होईलच”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, आता मालिकेत काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.