Veen Doghatli Hi Tutena Upcoming Twist: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट येताना दिसतात, त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार; स्वानंदी व समर यांच्या आयुष्यात कोणते नवे वळण येणार, त्यांच्यात परत भांडण होणार का, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होतात.
आता मात्र या मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. स्वानंदीचे एक नवीन रूप समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे. झी मराठी वाहिनीने ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये ट्विस्ट
या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की स्वानंदीला वृद्धाश्रमातून फोन येतो. तिला फोनवर सांगितले जाते की वृद्धाश्रमात काही गुंड आले आहेत आणि ते वृद्धाश्रमावर बुलडोझर चालवणार आहेत. ते आजी-आजोबांना मारत आहेत. हे ऐकल्यानंतर स्वानंदीला धक्का बसतो. या दरम्यान वृद्धाश्रमातील वृद्धांना गुंड त्रास देत असल्याचे पाहायला मिळते.
स्वानंदी वृद्धाश्रमात पोहोचते. ती त्यातील काही गुंडांना खाली पाडते. तिच्या हातात त्रिशुल दिसत आहे. संतापाने ती त्या गुंडांना म्हणते की, अरे माणसं आहात की हैवान आहात? त्यावर त्यातील एक जण म्हणतो, “या बांगड्या घातलेल्या हाताने बुलडोझर कसा रोखला जातोय?” त्यावर स्वानंदी पुन्हा संतापाने म्हणते, “या बांगड्यांमध्ये किती ताकद आहे हे माहितीये का तुला? बाईने ठरवलं ना तर ती अख्खं जग जिंकू शकते आणि तुझ्यासारख्या नराधमांपासून जगाला वाचवूही शकते”, असे म्हणत ती शेवटी त्या माणसावर त्रिशुल उचलताना दिसत आहे.
या सीनमध्ये स्वानंदीने हिरवी साडी नेसल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच तिच्या कपाळावर भंडारा आणि कुंकूदेखील लावले आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “वृद्धाश्रमावर चालून येणाऱ्या गुंडांविरोधात स्वानंदी घेणार दुर्गेचा अवतार”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, समरच्या कंपनीकडून याआधी वृद्धाश्रमाची जागा घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हे सर्व कारस्थान समर नाही तर त्याचा भाऊ करत आहे; याबद्दल समरला मात्र कोणतीही कल्पना नाही. यामुळेदेखील समर व स्वानंदीमध्ये मोठे गैरसमज झाले होते. तसेच, त्यांच्यात सतत छोटी मोठी भांडणे होताना दिसतात.
दरम्यान, आता मालिकेत काय घडणार, समर व स्वानंदी यांचे लग्न कसे ठरणार, त्यानंतर काय गमती जमती घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.