Thamma Box Office Collection Day 4 : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘थामा’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन चार दिवस झाले आहेत. समीक्षक आणि प्रेक्षकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना, नवाजुद्दीन सिद्दीकी, परेश रावल, सत्यराज, गीता अग्रवाल आणि रचित सिंग यांच्यासह इतर कलाकार आहेत.

चित्रपटाने तीन दिवसांत ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती, परंतु आता त्याची कमाई कमी झाली आहे. चित्रपटाने चौथ्या दिवशी, शुक्रवारी किती व्यवसाय केला ते जाणून घेऊया.

चौथ्या दिवसाच्या कमाईत घट

‘स्त्री’, ‘स्त्री २’, ‘रूही’, ‘भेडिया’ आणि ‘मुंज्या’नंतर ‘थामा’ हा मॅडॉक फिल्म्सचा सहावा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. त्याची कथा प्रेक्षकांना भावते आणि चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत ५० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, दिवाळीला, २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘थामा’ने पहिल्या दिवशी २४ कोटी रुपये कमावले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १८.६ कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी १३ कोटी रुपये कमावले.

आता शुक्रवारी, चौथ्या दिवशी, चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट झाली आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने ३.७९ कोटी कमावले, ज्यामुळे त्याचे एकूण कलेक्शन ५९.३९ कोटी झाले. हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांचा ‘एक दीवाने की दीवानियत’ हा चित्रपटदेखील ‘थामा’ चित्रपटाबरोबर प्रदर्शित झाला,परंतु त्याचे कलेक्शनदेखील विशेष प्रभावी नाही.

‘थामा’ चित्रपटात आयुष्मान खुराना एका छोट्या शहरातील पत्रकार आलोकची भूमिका साकारत आहे. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले आहे. रश्मिका मंदानाच्या ‘तडका’च्या भूमिकेने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. आलोक तडकाच्या प्रेमात पडतो. आयुष्मान खुरानाने यात एका व्हँपायरची भूमिका साकारली असून, त्याच्या अभिनयाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू आहे.

चित्रपट प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ‘थामा’चा बोलबाला दिसून येत आहे. हॉररबरोबर हलकीफुलकी कॉमेडी आणि अनपेक्षित ट्विस्ट प्रेक्षकांना थिएटरमध्ये खिळवून ठेवत आहे.