मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी हे आर्मी कुटुंबात जन्माला आले आहेत. बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचे वडील देशासाठी लढले आहेत. तर काहींनी देशासाठी प्राणार्पणदेखील केले आहे.

अशाच अभिनेत्रीपैकी एक म्हणजे निमरत कौर. निमरत हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. निमरत हिचा जन्म राजस्थान येथील एका शीख कुटुंबात झाला. निमरत हुतात्मा भूपेंद्र सिंग यांची लेक आहे. अभिनेत्री फक्त १२ वर्षांची असताना तिचे वडील देशासाठी हुतात्मा झाले. अभिनेत्रीनं अनेक मुलाखतींमधून याबाबत उघडपणे भाष्य केलं आहे.

संपूर्ण देश यावेळी सैनिकांसाठी प्रार्थना करीत आहे. दरम्यान, निमरत कौरनं म्हटलं आहे की, तिच्या वडिलांनीही या देशासाठी बलिदान दिलं. अभिनेत्रीनं सांगितलं की, जेव्हा ती १२ वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांची काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हत्या केली.

वडिलांची दहशतवाद्यांनी केली हत्या

निमरत कौरनं ईटाइम्सला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत तिच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल सांगितलं होतं. निमरत कौर म्हणाली, “ते एक तरुण आर्मी मेजर होते, एक इंजिनीयर होते आणि ते वेरीनाग येथील आर्मीच्या सीमावर्ती रस्त्यांवर तैनात होते. काश्मीर हे कुटुंबासाठी योग्य ठिकाण नव्हतं, म्हणून जेव्हा त्यांची पोस्टिंग काश्मीरला झालेली, त्यावेळी आम्ही पटियालातच राहायचो.” निमरतने सांगितले की, मृत्यूच्या वेळी ते फक्त ४४ वर्षांचे होते.

निमरत पुढे म्हणाली, “जानेवारी १९९४ मध्ये आम्ही आमच्या हिवाळ्याच्या सुट्यांमध्ये वडिलांना भेटण्यासाठी काश्मीरला गेलो होतो, तेव्हा हिजबुल-मुजाहिदीनने वडिलांचे अपहरण केले आणि सात दिवसांनी त्यांची हत्या केली. त्यांनी काही दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी केली होती, जी माझ्या वडिलांनी मान्य केली नाही. मृत्यूच्या वेळी ते फक्त ४४ वर्षांचे होते. आम्हाला ज्यावेळी कळलं की, ते शहीद झालेत, त्यावेळी आम्ही त्यांचं पार्थिव घेऊन दिल्लीला परतलो आणि मी त्यांचं पार्थिव पहिल्यांदा दिल्लीत पाहिलेलं.”

दरम्यान, निमरत कौर सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कुल’ या सीरिजमुळे चर्चेत आहे. या अभिनेत्रीनं यापूर्वी ‘स्काय फोर्स’, ‘दसवी’, ‘साजन शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ व ‘एअरलिफ्ट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.