‘बालक पालक’, ‘टाइमपास’ चित्रपटांमुळे नावारुपाला आलेला अभिनेता म्हणून प्रथमेश परबला ओळखले जाते. प्रथमेश परब हा सध्या यशाच्या शिखरावर आहे. प्रथमेश हा टाईमपास या चित्रपटातील दगडू या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आला. “हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है’ म्हणणारा प्रथमेश पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. नुकतंच त्याने त्याच्या ड्रीम गर्लबद्दल खुलासा केला आहे.

‘टाइमपास’ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू-प्राजूची जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोरी. पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनाला हुरहूर लावून अधुरी राहिलेली प्रेमकथा दुसऱ्या भागात प्रेक्षकांना आनंद देत पूर्ण झाली. पहिल्या भागात बालपणी एकमेकांपासून दुरावलेले दगडू आणि प्राजू दुसऱ्या भागात तरुणपणात एकमेकांना भेटले आणि एकही झाले. याच बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं ? प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल झाले? हे सांगणारी गोष्ट आता टाइमपास ३ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

याच चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच त्याने ‘सकाळ’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली. यात त्याने त्याच्या ड्रीम गर्लबद्दल भाष्य केले आहे. या मुलाखतीत त्याला ‘तुझी आता ड्रीम गर्ल कोण?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “सध्या माझी ड्रीम गर्ल अभिनेत्री आलिया भट्ट आहे. मी आतापर्यंत तिच्यासारखी अभिनेत्री पाहिलेली नाही. ती प्रत्येक चित्रपटात नव्याने समोर येते.”

“मला तिच्याविषयी फार आदर आहे. मला आलिया भट्टसोबत काम करण्याची फार इच्छा आहे. जर भविष्यात तशी संधी मिळाली तर मी ती कधीच नाकारणार नाही”, असेही प्रथमेश परबने म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान टाइमपास ३ दिवसेंदिवस प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. येत्या २९ जुलैला झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधव यांचं आहे. याद्वारे प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे ही जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.