कहाणी अधुरीच राहिली..

चतुरस्र अभिनेत्री ते पडद्यावरची ग्लॅमरस आई

एक अभिनेत्री म्हणून प्रत्येक माध्यमावर आपला प्रभाव टाकणाऱ्या रीमा यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या आईकडूनच मिळाला होता. रीमा यांचे पूर्वाश्रमीचे नाव नयन भडभडे.

चतुरस्र अभिनेत्री ते पडद्यावरची ग्लॅमरस आई

हिंदी चित्रपटसृष्टीत वीस-पंचवीस वर्षांपूर्वी ‘हिरो’ म्हणून ज्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले त्या प्रत्येकाच्या पडद्यावरच्या ‘आई’ची भूमिका अभिनेत्री रीमा यांनी केली होती. आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, अजय देवगण, संजय दत्त, राहुल रॉय, गोविंदा ते अगदी जुही चावला, काजोल यांच्या आईच्या भूमिकेतही रीमा ठळकपणे लक्षात राहिल्या. रंगभूमीवर एक दिग्गज, कमालीची प्रतिभावंत अभिनेत्री ही त्यांची ओळख शेवटपर्यंत कायम होतीच. पण छोटा पडदा असेल किं वा मोठा पडदा.. कधी करारी सून, कधी खटय़ाळ सासू, कधी मुलाच्या प्रेमभावना जाणून घेऊनही त्याचे करिअर पहिले घडावे म्हणून कठोर निर्णय घेणारी आई, कधी कैकेयीच्या भूमिकेतील आई, ग्लॅमरस विहीणबाई अशा कित्येक भूमिकांमधली त्यांची छबी लोकांच्याच काय त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांच्या मनातही कायमची कोरली गेली आहे. त्यांचे आणखी  काही चित्रपट आणि मालिका प्रसिद्ध  होणार होत्या. मात्र, त्याआधीच त्यांनी निरोप घेतल्याने ही कहाणी अधुरीच राहिली.

एक अभिनेत्री म्हणून प्रत्येक माध्यमावर आपला प्रभाव टाकणाऱ्या रीमा यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या आईकडूनच मिळाला होता. रीमा यांचे पूर्वाश्रमीचे नाव नयन भडभडे. त्यांची आई मंदाकिनी भडभडे याही अभिनेत्री होत्या. पुण्याच्या हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थीदशेतच त्यांच्या अभिनयाची दखल घेतली गेली होती. ‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ अशा चित्रपटांतून ‘बेबी नयन’ नावाने बालकलाकार म्हणून रिमा यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी मराठी नाटकांमधून अभिनयक्षेत्रात पाऊल टाकले आणि मागे वळून पाहिलेच नाही. ‘घर तिघांचं हवं’, ‘चल आटप लवकर’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘तो एक क्षण’, ‘पुरुष’, ‘बुलंद’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘विठो रखुमाय’, ‘सासू माझी ढांसू’ यासारख्या दर्जेदार नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचे खणखणीत नाणे वाजवले होते. ‘पुरुष’ या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. अभिनेता विवेक लागू यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्या रीमा लागू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र काही वर्षांनंतर दोघेही विभक्त झाले. मृण्मयी लागू ही त्यांची कन्याही मराठी नाटय़-चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे.

ऐंशीच्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला. १९८० सालच्या ‘आक्रोश’, ‘कलयुग’ या चित्रपटांपासून त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. ‘रिहाई’ चित्रपटातील वेगळ्या वळणाची भूमिका असो किंवा ‘कयामत से कयामत तक’, ‘मंने प्यार किया’, ‘हम आप के हैं कौन’, ‘वास्तव’, ‘कल हो ना हो’सारख्या चित्रपटांमधून त्यांनी केलेली आईची भूमिका असो.. आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी त्या जिवंत केल्या. हिंदी चित्रपटांमध्ये आई म्हटले की निरुपा रॉय यांची एका ठरावीक पद्धतीची प्रतिमा लोकांच्या डोळ्यासमोर यायची. रीमा यांनी पडद्यावरच्या या आईच्या प्रतिमेलाच छेद दिला. अत्यंत ग्लॅमरस आई म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली. आपल्या वाटय़ाला आलेल्या आईच्या भूमिकेतही त्यांनी वैविध्य ठेवत आपली दखल घ्यायला भाग पाडले. त्यांची प्रत्येक आईची भूमिका लोकांच्या लक्षात राहिली, इतक्या सहजतेने त्यांनी त्या व्यक्तिरेखा जिवंत केल्या होत्या. अगदी गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘जाऊं द्या ना बाळासाहेब’ या मराठी चित्रपटात त्यांनी साकारलेली गिरीश कुलकर्णी यांची ग्रामीण तरीही ग्लॅमरस आईही भाव खाऊन गेली. ‘अनुमती’ या पुरस्कारप्राप्त चित्रपटात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातली त्यांची भूमिका अनेक चित्रपट महोत्सवातही नावाजली गेली.

चित्रपटांबरोबरच मालिकाही त्यांनी गाजवल्या. सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘तू तू मैं मैं’ ही त्यांची गाजलेली हिंदी मालिका. ‘श्रीमान श्रीमती’, ‘खानदान’ या त्यांच्या हिंदीतील मालिका. मराठीतही त्यांनी ‘तुझं माझं जमेना’ ही मालिका केली होती. महेश भट्ट यांच्यासारख्या दिग्दर्शकाच्या लेखणीतून उतरलेल्या ‘नामकरण’ मालिकेत काम करायला मिळाले म्हणून त्या आनंदी होत्या. भट्ट यांच्याबरोबर चित्रपटातून काम करण्याचा अनुभव होताच. आता त्यांच्या मालिकेतून एक चांगली व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्याने त्या उत्साहात होत्या. लवकरच आपले चित्रपट पाहायला मिळतील, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र मालिका अर्धवट सोडून आणि मराठी चित्रपट येण्याआधीच त्यांनी आपला जीवनप्रवास संपवला..

श्रद्धांजली

माझी रीमाताई आज कायमची सोडून गेली हे पचवायला खूप कठीण जात आहे. पण देवापुढे आपण फक्त कठपुतळी आहोत. जगात आणणारा तोच नेणाराही तोच. वेळा ठरलेल्या असतात. त्या कधीच चुकत नाहीत. सहा महिन्यांत मृत्यूला फारच जवळून पाहिले, अनुभवले. एकदा अश्विनीच्या वेळी व आता रीमाताईच्या वेळी.  – शरद पोंक्षे, अभिनेते

मी पुन्हा आज माझ्या आईला गमावले आहे. आम्ही अनेक चित्रपटांमधून एकत्र काम केले होते आणि प्रत्येक वेळी त्यांच्याबरोबर काम करताना मला नवे काही शिकायला मिळायचे. आज त्यांच्या निधनाने माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे जी भरून निघणे कठीण आहे. देव त्यांच्या कुटुंबीयांना आणि जीवलगांना या प्रसंगातून बाहेर पडण्याची शक्ती देवो.   -संजय दत्त, अभिनेता

काही व्यक्तींशी आपला रोजचा संबंध नसला तरी त्यांच्या अशा अकस्मात जाण्याने काही काळ सुन्न व्हायला होते त्यातलेच एक नाव रीमाताई!   – हेमांगी कवी, अभिनेत्री

धक्कादायक आणि विश्वास बसणार नाही अशी बातमी. एक उत्कृष्ट अभिनेत्री.   – अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते

गुणी अभिनेत्री रीमा यांच्या निधनाची बातमी ऐकून मला अतिशय धक्का बसला आणि दु:ख झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.  – लता मंगेशकर, ज्येष्ठ गायिका

रीमा यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. रुपेरी पडद्यावरील त्या माझ्या आवडत्या ‘आई’ होत्या.    – प्रियांका चोप्रा, अभिनेत्री

रीमा यांचे जाणे हा चित्रपट, नाटय़सृष्टी आणि दूरचित्रवाहिन्यांसाठी वाईट दिवस आहे. त्या कलाकार म्हणून चांगल्या होत्याच, पण माणूस म्हणूनही तितक्याच चांगल्या होत्या.    – आशुतोष गोवारिकर, दिग्दर्शक

यासह मधुर भांडारकर, महेश भट्ट, ऋषी कपूर, सिद्धार्थ जाधव, माधुरी दीक्षित -नेने, करण जोहर, रितेश देशमुख, सोनी राजदान, आलिया भट्ट आदींनीही आपली श्रद्धांजली वाहिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tribute to reema lagoo