Trisha Krishnan Marriage Rumors : त्रिशा कृष्णन ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आजकाल त्रिशा कृष्णन तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एकामागून एक अपडेट्स समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्रिशा कृष्णनच्या लग्नाच्या बातम्या आल्या होत्या. या सगळ्यामध्ये त्रिशा कृष्णनच्या लग्नाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.सियासत डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, त्रिशा कृष्णनच्या पालकांनी तिच्यासाठी चंदीगडमधील एका व्यावसायिकाची निवड केली आहे. मुलाबद्दल अधिक माहिती उघड झालेली नसली तरी दोन्ही कुटुंबे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात असे वृत्त आहे. वृत्तात असेही म्हटले आहे की, त्रिशा कृष्णन अलीकडेच लग्नाच्या अफवांवर बोलली आहे. ती म्हणाली, “जर मला योग्य व्यक्ती सापडली तर मी लग्न करण्यास तयार आहे, पण अजून वेळ आलेली नाही.” या बातमीनंतर त्रिशा कृष्णनचे चाहते खूप आनंदी आहेत.
अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या लग्नाबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. त्रिशा कृष्णनने २०१५ मध्ये उद्योजक वरुण मनियनशी साखरपुडा केला होता, पण काही महिन्यांतच त्यांचं नातं तुटले, त्यामुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. पुढे त्रिशाने अभिनयावर लक्ष केंद्रित केले.
त्रिशा कृष्णनच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेता विजयबरोबरची तिची जोडी इंडस्ट्रीमध्ये खूप पसंत केली जाते. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘घिली’ (२००४), ‘थिरुपाची’ (२००५), ‘आथी’ (२००६) आणि ‘कुरुवी’ (२००८) सारख्या हिट चित्रपटांमधील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. पण, ‘कुरुवी’नंतर त्यांनी अचानक एकत्र काम करणे थांबवले, ज्यामुळे अफवा पसरल्या की ‘घिली’ दरम्यान त्यांची मैत्री प्रेमात बदलली.
२०२४ हे वर्ष त्रिशासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरलं आहे. ‘पोन्नियिन सेल्वन’मध्ये ‘कुंडवई’च्या भूमिकेत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली, तर ‘लियो’मध्येही तिने केलेल्या अभिनयाचं कौतुक झाले. या वर्षी रिलीज झालेल्या कमल हासन यांच्या ‘ठग लाईफ’ चित्रपटामध्ये ती दिसली होती. त्रिशाच्या लग्नाची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.
