शुभमंगल सावधान या चित्रपटासाठी माझे डॅडी म्हणजेच महेश कोठारे हे नवीन चेहऱ्याचा शोघ घेत होते. त्यासाठी उर्मिला कामासाठी घरी आली होती. त्यावेळी मी नुकताच झोपेतून उठलो होतो. मी झोपेतून उठताच उर्मिलाला समोर पाहिले आणि पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडलो. तिची नायिका म्हणून ती पहिली फिल्म होती. आणि मी त्या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर होतो. सेटवर माझी आणि तिची ओळख झाली. त्याचं हळूहळू प्रेमात रूपांतर झालं. चित्रपट पूर्ण झाल्यावरही आमच्या भेटीगाठी वाढू लागल्या. पण मी तिला अजून प्रपोज केलं नव्हतं. आमची पहिली डेटही मला स्पष्ट आठवते. त्या दिवशी आम्ही पुण्यात भेटलो आणि लॉ कॉलेज रोडवरील कॅफे कॉफी डेमध्ये गेलो होतो. त्यावेळी पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली होती. बाहेर पाऊस पडत होता. कोसळणाऱ्या सरी, मधूनच वाहणारा वारा असे रोमँटिक वातावरण तयार झालं होतं. अशा वातावरणात आमची झालेली भेट, तिच्याशी मारलेल्या गप्पा यामुळे ते क्षण अविस्मरणीय ठरले. या भेटीनंतर मुंबईत आल्यावर मी तिला प्रपोज केलं.

एकमेकांशी बरीच वर्ष डेट केल्यावर मग २० डिसेंबर २०११ला आम्ही एकमेकांशी विवाहबद्ध झालो. उर्मिला अभिनेत्री म्हणून उत्तम आहेच पण पत्नी म्हणून मला जास्त आवडते. आमची सर्वसामान्य माणसांप्रमाणे भांडणे होतात पण त्यातून चांगलंच निष्पन्न होतं. मुळात उर्मिला खूप प्रामाणिक आहे. एक जोडीदार म्हणून तिचा हाच प्रामाणिकपणा मला खूप भावतो. आम्ही एकमेकांसोबत खूप चांगले क्षण व्यतित केले आहेत. व्यग्र शेड्यूलमधून आमच्या वेळा जुळून आल्या की लेट नाईट लाँग ड्राईव्हला जातो. तेव्हा आमच्यात खूप गप्पा होतात, शेअरिंग होतं. आमच्या कामाच्या वेळा बऱ्याचदा जुळत नाहीत. पण, जेव्हा जुळतात तेव्हा ते क्षण आम्ही दोघं खूप एन्जॉय करतो.
गेल्या वर्षी आम्ही न्यूझिलंडमध्ये साउथ आयलंडला फिरायला गेलो होतो. एक गाडी ठरवून आम्ही तिथे खूप मनमुराद भटकलो. तेव्हा उर्मिलाने मला स्काय डायव्हिंगचा आग्रह केला होता. मला स्काय डायव्हिंगची कल्पना थोडी जास्त अॅडव्हेंचरस वाटत होती. पण, तिच्या आग्रहावरून आम्ही तिथे स्काय डायव्हिंग केलं. आकाशात उंचावरून विमानातून खाली उडत येताना खूप मजा आली. तेव्हा सोबत उर्मिला असल्यामुळे ते क्षणही आमच्यासाठी खूप खास होते. आम्ही दोघंही फूडी आणि ट्रॅव्हलर्स आहोत. त्यामुळे तो क्षण आमच्यासाठी एक अविस्मरणीय अशी आठवण बनला आहे.

urmila-3

या वर्षीचा व्हॅलेंटाइन डे खरंतर खूप कामाचा असणार आहे. मी आणि उर्मिला प्रेक्षकांसाठी एक छान म्युझिकल ट्रीट देणार आहोत. आम्ही एक लाइव्ह म्युझिकल शो करणार आहोत. त्यात गायन क्षेत्रातले तमाम दिग्गज असतील. उर्मिला त्या शोची क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. त्यामुळे कामात बिझी असलो तरीही आमच्यासाठी यंदाचा व्हॅलेंटाइन डे म्युझिकल असणार आहे. यात मला उर्मिलाचीही साथ असेल, त्यामुळे तो दिवस खूपच स्पेशल असणार आहे.
– आदिनाथ कोठारे

urmila-2