ज्येष्ठ अभिनेते कमल हासन गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कन्नड भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर कर्नाटकातून अनेकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला, तर यासाठी त्यांचा निषेधही करण्यात आला. कमल हासन त्यांच्या ‘ठग लाईफ’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशातच नुकताच या चित्रपटाचा म्युझिक लाँचचा कार्यक्रम पार पडला.
‘ठग लाईफ’ चित्रपटाच्या म्युझिक लाँचच्या कार्यक्रमाला कमल हासन उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी संवाद साधताना कन्नड भाषेबद्दल वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे ते अडचणीत सापडले. या कार्यक्रमात कमल हासन म्हणाले होते, “कन्नड भाषेचा जन्म तामिळ भाषेतून झाला आहे.” यानंतर कर्नाटकातील लोकांनी यावर आक्षेप घेतला आणि त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. कमल हासन यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर तेथील लोकांनी त्यांच्याकडून माफीची मागणी केली आहे.
अभिनेते व राजकारणी कमल हासन यांनी नुकतीच यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. कमल हासन म्हणाले, “मी चुकीचं बोललो असेन तर माफी मागेन अन्यथा नाही, अशीच माझी जीवनशैली आहे.” परंतु, आता कर्नाटका फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स (KFCC) ने कमल हासन जोवर माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांचा ‘ठग लाईफ’ चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित होणार नसल्याचं जाहीर केलं आहे.
कमल हासन यांच्या ‘ठग लाईफ’ या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट येत्या ५ जूनला प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘ठग लाईफ’मध्ये कमल हासन यांच्यासह अभिनेत्री त्रिशा कृष्णन, महेश मांजरेकर, सिलंबरासन हे कलाकार झळकणार आहेत.
दरम्यान, कमल हासन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते अभिनयासह चित्रपट निर्मातेदेखील आहेत. त्यांनी तामिळसह हिंदी भाषेतही काम केलं आहे. त्यांनी आजवर ‘पोनियिन सेल्वन: १’, ‘कल्की २८९८ ए.डी.’, ‘लीओ,’ ‘विक्रम,’ ‘मुंबई एक्स्प्रेस,’ ‘गुना,’ ‘सत्या,’ ‘सदमा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.