बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते धमेंद्र यांना शारीरिक अस्वस्थ्यामुळे नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अजूनही ते नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सोमवारी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल केले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. उपचारादरम्यान त्यांना पोटासंबंधिचा (गॅस्ट्रो) आजार असल्याचे निष्पन्न झाले. काल मुंबईमध्ये आल्यावर दुखणे असह्य झाल्यामुळे त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नानावटी रुग्णालयाचे डॉ. विशेष अग्रवाल हे धर्मेंद्र यांच्यावर उपचार करत आहेत. ते म्हणाले की, पोटाच्या आजारामुळे धमेंद्र यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आम्ही त्यांच्यावर उपचार करत आहोत. ते उपचारांना योग्य प्रतिसादही देत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात त्यांना डिस्चार्जही देऊ.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी धमेद्र यांनी त्यांचा ८१ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी हेमा मालिनी आणि त्यांची मुलगी इशा यांनी ट्विटरवरुन शुभेच्छाही दिल्या. ‘माझ्या करिअरमधील हा सर्वात उत्तम दिवस आहे. तुमच्यासोबत घालवलेली इतकी वर्ष आणि आपल्या दोन मुली. हॅपी बर्थडे धरमजी,’ असे ट्विट मालिनी यांनी केले. ‘हॅपी बर्थडे माझे बाबा, माझे हिरो, माझं पहिलं प्रेम. देव तुम्हाला उत्तम आरोग्य आणि खूप सारा आनंद देवो. आम्हा सर्वांचे तुमच्यावर फार प्रेम आहे,’ असे इशाने ट्विट केले.
१९३५ मध्ये पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील एका गावात धमेंद्र यांचा जन्म झाला. १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या सिनेमातून धमेंद्र यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘बंदिनी’, ‘फूल और पत्थर’, ‘अनुपमा’, ‘चुपके चुपके’ आणि ‘शोले’ यांसारख्या सिनेमात काम केले.