Vijay Deverakonda Car Accident : अभिनेता विजय देवरकोंडाचा अपघात झाला आहे. तेलंगणामध्ये जोगुलांबा गडवाला जिल्ह्यातील उंडावल्लीजवळील अभिनेता विजय देवरकोंडाच्या कारचा अपघात झाला. अभिनेत्याची लेक्सस कार एका बोलेरोशी धडकल्याची माहिती समोर आली आहे.

विजय देवरकोंडा व रश्मिका मंदाना यांच्या साखरपुड्याच्या चर्चा सुरू असतानाच त्याच्या अपघाताची बातमी आल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. समोर जाणारी बोलेरो अचानक उजवीकडे वळली, त्यामुळे विजयच्या कारचा अपघात झाला. या अपघातात विजय देवरकोंडाच्या कारचं नुकसान झालं आहे. अपघातानंतर विजय देवरकोंडाने एक्सवर पोस्ट करून चाहत्यांना अपघाताबद्दल अपडेट दिली आहे.

विजयने एक्सवर पोस्ट करून चाहत्यांना काळजी न करण्याचं आवाहन केलं. “सगळं ठीक आहे. गाडीचा अपघात झाला, पण आम्ही सर्वजण ठीक आहोत. स्ट्रेंथ वर्कआउट करून आताच घरी परतलो. माझं डोकं दुखतंय, पण बिर्याणी आणि झोप बरं करू शकणार नाही, असं काहीच नाही. तुम्हा सर्वांना खूप प्रेम. कोणत्याही बातम्यांमुळे तुम्ही ताण घेऊ नका,” अशी पोस्ट विजय देवरकोंडाने केली आहे.

विजय देवरकोंडाची पोस्ट

Vijay Deverakonda reacts on car accident
विजय देवरकोंडाची पोस्ट (सौजन्य – एक्स)

अपघात झाला तेव्हा विजय देवरकोंडा गाडीत होता, पण तो या घटनेतून सुखरूप बचावला, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिली आहे. बोलेरो अचानक दुसरीकडे वळल्याने हा अपघात झाला. यात विजयच्या गाडीचं नुकसान झालं आहे. पण गाडीतील सर्वजण सुखरूप आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “अभिनेता विजय देवरकोंडा दुपारी ३ वाजताच्या सुमारास पुट्टपर्थीहून हैदराबादला जात होता. त्यावेळी समोरची एक बोलेरो गाडी अचानक उजवीकडे वळली, ज्यामुळे विजयची गाडी डाव्या बाजूला धडकली. विजय आणि इतर दोघेजण गाडीत होते. सुदैवाने, कोणीही जखमी झालेलं नाही. त्यांनी ताबडतोब दुसऱ्या गाडीने पाठवण्यात आलं. विजयच्या टीमने विम्याच्या कारणास्तव पोलीस तक्रार दाखल केली.”

दरम्यान, रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा यांनी सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर नुकताच साखरपुडा केला आहे. हैदराबादमध्ये दोघांचे कुटुंबीय व मोजक्याच मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला. दोघेही फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न करणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.