७४ व्या स्वातंत्र्यदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशाला आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला. त्यांच्या या भाषणावर बॉलिवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक विशाल दादलानी याने प्रतिक्रिया दिली आहे. जो पर्यंत भारत चीनी वस्तूंची आयात थांबवत नाही तो पर्यंत आपण आत्मनिर्भर कसे होणार? असा सवाल त्याने मोदींना केला आहे.
Happy Independence Day, @narendramodi ji.
Just a reminder that China is still sitting on Indian territory.While that is so, India is still buying goods from China and giving them major infrastructural contracts.
What was the content of this so-called reply, exactly? https://t.co/Wwdjs9UENX
— VISHAL DADLANI (@VishalDadlani) August 15, 2020
“सर्व देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मोदीजी चीन अजूनही आपल्या सीमेवर ठाण मांडून बसलाय. असं असतानाही आपण चीनी वस्तूंची आयात थांबवलेली नाही. आपण अजूनही चीनसोबत व्यवसायिक करार करतच आहोत. मग आपण आत्मनिर्भर कसे काय होणार?” अशा आशयाचं ट्विट विशाल दादलानी याने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. “करोनाने सगळयांना रोखलं आहे. करोनाच्या कालखंडात करोना योद्धयांनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो.”
- १३० कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने करोनावर विजय मिळवू
- आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करण्याचा आजचा दिवस आहे. सतत देशवासियांच्या सुरक्षेमध्ये असणाऱ्या लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे.
- आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. आत्मनिर्भर होणे अनिवार्य आहे. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे, ते देशासाठी आवश्यक आहे. भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल. मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. भारताने ठरवलं तर करुन दाखवतो. जगाला भारताकडून अपेक्षा आहे.
- देशात मोठया प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. कच्चा माल कधीपर्यंत जगामध्ये पाठवत राहणार ? त्यासाठी आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये योगदान द्यायचे आहे.
- कृषिक्षेत्रात भारत आत्मनिर्भर आहे. फक्त देशाचीच नव्हे तर अन्य देशांना सुद्धा कृषिमालाचा पुरवठा करु शकतो.
- एक काळ होता आपल्या देशात ज्या वस्तुंची निर्मिती व्हायची, त्याचे जगभरात कौतुक व्हायचे. आत्मनिर्भर म्हणजे फक्त आयात कमी करणे नव्हे, तर भारतात बनवलेल्या सामानाचे सर्वत्र कौतुक झाले पाहिजे.
- वोकल फॉर लोकल जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. भारतात मोठया प्रमाणावर होणाऱ्या सुधारणा जग पाहत आहे. त्यामुळेच भारतात होणाऱ्या FDI गुंतवणूकीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. करोना संकटकाळातही भारतात मोठया प्रमाणावर FDI गुंतवणूक झाली आहे.
- मेक इन इंडियाच्या बरोबरीने आता मेक फॉर वर्ल्डसाठी उत्पादने बनवायची आहेत.
- विकास यात्रेत मागे राहिलेल्या देशातील ११० जिल्ह्यांना पुढे नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.
- शेतकऱ्यांना बंधनातून मुक्त केले. माझ्या देशातील शेतकरी उत्पादन केल्यानंतर त्याल हवं तिथे तो विकू शकत नव्हता. आम्ही त्याला बंधनातून मुक्त केले. आता तो त्याला हव तिथे, त्याच्या अटीनुसार पिकवलेला कृषीमाल विकू शकतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
- सात कोटी गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर दिला. ८० कोटी पेक्षा जास्त लोकांना मोफत अन्न दिले. ९० हजार कोटी थेट बँक खात्यात जमा केले.
- ‘जल जीवन मिशन’तंर्गत दोन कोटी पेक्षा जास्त कुटुंबांना स्वच्छ पाणी उपलब्ध करुन दिले.
- ‘इज ऑफ लिव्हिंग’चा मध्यमवर्गाला सर्वाधिक फायद झाला आहे. स्वस्त इंटरनेट ते इकोनॉमिकल हवाई तिकीट, हायवे ते आय वे, परवडणाऱ्या दरातील घरे ते कर कपात या सर्व उपायोजनांचा मध्यवर्गाला फायदा होणार आहे.
- करोना आला तेव्हा सुरुवातीला फक्त ३०० चाचण्या व्हायच्या पण आता दिवसाला सात लाख टेस्ट होतात.
- आजपासून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. प्रत्येक भारतीयाला हेल्थ आयडी दिला जाईल. तुमची प्रत्येक चाचणी, आजार याची माहिती त्या आयडीमध्ये असेल.
- देशातील शास्त्रज्ञ करोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. भारतातील तीन लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. वैज्ञानिकांनी हिरवा कंदिल दाखवल्यानंतर मोठया प्रमाणावर लसीचे उत्पादन सुरु होईल. कमीत कमी वेळेत करोनावरील लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा आराखडा तयार आहे.
- दीड लाख पंचायतींमध्ये ‘ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क पोहोचले आहे. वेळेबरोबर प्राधान्यक्रम बदलला आहे. पुढच्या १ हजार दिवसात सहा लाख गावांमध्ये ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क पोहोचवणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.
- LOC पासून LAC पर्यंत ज्यांनी देशात्या संप्रुभतेला धोका निर्माण केला, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. भारताच्या संप्रभुतेच्या रक्षणासाठी संपूर्ण देश संकल्पित आहे. दहशतवाद किंवा विस्तारवाद असो, भारत ठामपणे मुकाबला करत आहे.